महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाड-दापोली राज्य मार्गावर मे महिन्यापासून सुरू झालेली अपघातांची मालिका ऑगस्ट महिन्यातही कायम असून आज दुपारी (सुमारे २ वाजता) कारंजाडी बुद्धवाडी येथील तीव्र उतारावर मुंबई–मंडणगड एसटी बस घसरल्याची घटना घडली.सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली तरी रस्ता निसरडा होण्यामागचे खरे कारण रस्त्याच्या गुळगुळीतपणात की देखभाल अभावात, याबाबत स्थानिकांमध्ये शंका व्यक्त होत आहे. मंडणगड आगारातील एमएच-२० बीएल-१७१५ क्रमांकाची बस पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर नियंत्रण सुटून रस्ता सोडून साईटपट्टीवर जाऊन चिखलात रुतली. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही पुणे फौजी अंबवडे–अहिरे–कोंड या बसला अपघात झाला होता.स्थानिकांचा आरोप आहे की मे महिन्यात निकृष्ट दर्जाचे डांबर वापरून ‘शिलकोट’ मारून रस्त्याचे डांबरीकरण करणाऱ्या एफएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणतीही कारवाई केलेली नाही.गणेशोत्सव काळात या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशावेळी सतत होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.