रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
रायगडच्या पेण तालुक्यात वीज पुरवठा समस्येने गंभीर रूप धारण केल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला.वडखळ, बोरी,शिर्की,वाशी, काराव, शिहू आणि हमरापूर या विभागांतील रहिवाशांनी माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या हुडको पेण येथील कार्यालयावर मोर्चा काढला. दररोज सरासरी ८ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन जीवन, लहान व्यवसाय तसेच गणेशोत्सवासाठी मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांच्या कामावर मोठा परिणाम होत आहे. याशिवाय, महावितरणचे कर्मचारी रीडिंग न घेता मनमानी वाढीव बिले पाठवत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. स्मार्ट मीटर बसवण्याचा जबरदस्तीचा प्रयत्न, डीपीमधून तेलगळतीमुळे वाढलेला अपघाताचा धोका, तसेच स्थिर आकार, इंधन आकार, वाहन आकार आणि इतर छुपे शुल्कामुळे होणारे आर्थिक शोषण यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या सर्व समस्यांबाबत दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी मोर्चाचा पवित्रा घेतल्याचे संजय जांभळे यांनी स्पष्ट केले. त्यांनी मांडलेल्या १० मागण्यांना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्याबाबत लेखी हमी दिली आहे. श्रावण आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर वीजपुरवठा खंडित होणे, चुकीची बिले व धोकादायक विद्युत उपकरणे या समस्या अधिक गंभीर झाल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी संजय जांभळे, अशोक मोकल, के. पी. पाटील, के. जी. पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.