राज्याला देशातच नव्हे,तर जागतिक स्तरावर नेण्यासाठी आम्ही आगामी पाच वर्षांसाठी एक ठोस आणि सर्वसमावेशक व्हिजन निश्चित

0
5

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या एकमेव अजेंड्यावर राज्य शासन काम करत आहे. राज्याला देशातच नव्हे,तर जागतिक स्तरावर नेण्यासाठी आम्ही आगामी पाच वर्षांसाठी एक ठोस आणि सर्वसमावेशक व्हिजन निश्चित केले आहे.आज आपण ज्या संधी आणि आव्हानांसमोर उभे आहोत, त्यावर मात करत एक स्थिर, समृद्ध, आणि लोकाभिमुख महाराष्ट्र घडवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज अलिबाग येथे  केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक आचल दलाल,उप वनसंरक्षक राहुल  पाटील,अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, कार्यकारी अभियंता, सां.बा.अलिबाग श्रीमती मिनाक्षी धायतडक, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.कु.आदिती तटकरे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच  देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर, शहीद यांना वंदन केले.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की,नागरिकांच्या आशा-आकांक्षांचा विचार करून विकास प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग, दूरदृष्टी ठेवून योग्य नियोजन, जगातील अत्याधुनिक संकल्पना तंत्रज्ञानाचा वापर, उत्पन्नाच्या स्रोतात वाढ आणि विकास प्रकल्पांच्या गतीने पूर्णत्वासाठीचा पाठपुरावा या माध्यमातून भविष्यातील ‘विकसित रायगड जिल्हा साकारला जाईल यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करु.

महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान”सुरू करत आहे. हे अभियान केवळ स्पर्धात्मक नसून, ग्रामविकासाच्या लोकचळवळीला चालना देणारे महत्त्वाचे माध्यम ठरेल.गावागावात सुशासन प्रस्थापित करणे, आत्मनिर्भरता निर्माण करणे, आणि विकासाची स्पर्धात्मक भावना रुजवणे हा मुख्य उद्देश आहे. योजना केवळ प्रशासकीय यंत्रणा पुरती मर्यादित नसून, ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारलेली आहे.

प्रत्येक गाव, पंचायत आणि नागरिकाने हे अभियान आपले समजून काम केले तर गावाचा चेहरामोहराच बदलू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि जिल्हा बळकट करण्यासाठी सहकार्य करावे.असे आवाहन अदिती तटकरे यांनी यावेळी केले.

महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने सन 2025-26 पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

राज्य शासन व टाटा समूह उद्योग यांच्यावतीने रोहा येथे कौशल्यवर्धन केंद्र शिक्षणाचे नवे दालन उभारण्यात येत आहे. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून मे 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आजच्या घडीला जवळपास सर्वच क्षेत्रात AI चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आगामी काळात आवश्यक ठरणार आहे.  या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना या प्रकल्पाचा फायदा होणार असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.  या प्रशिक्षण केंद्रातून दरवर्षी 3 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेवून कोर्स पूर्ण करणार आहेत. यामुळे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.

राज्याने नुकतेच वाळू निर्गती धोरण जाहीर केले आहे. स्थानिक वापरासाठी आणि शासनाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वामित्वधन न आकारता कमाल पाच ब्रास पर्यंत वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्र, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या पायाभूत सुविधांना प्राधान्य देतानाच सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही जिल्हा शासन आणि प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री कु तटकरे यांच्या हस्ते अवयव दात्यांचा,१०० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम दुसरा टप्पा निवड झालेल्या कार्यालयाना,पूर्व उच्च प्राथमिक ५वी व पूर्व माध्यमिक ८ वी शिष्यवृत्ती परिक्षा २०२५ प्रमाणपत्र, सैनिक नायक पदक (ताम्रपटांचे वितरण) २०२५, नगरपरिषद आस्थापनेवरील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेशाचे, आपत्ती प्रसंगी सहकार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.