उरण शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. “गोविंदा रे गोपाळा… तुझ्या घरात नाही पाणी रे, घागर उताणी रे गोपाळा” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पावसाच्या जोरदार सरींमुळे बालगोपाळ अक्षरशः न्हाऊन निघाले आणि उत्सवाला आणखी रंग चढला.या उत्सवाचे औचित्य साधून नवी मुंबई पोलिसांनी उरण, न्हावा शेवा, मोरा सागरी पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून नशामुक्ती जनजागृतीचा संदेश दिला. ठिकठिकाणी गोविंदा पथकांनी थरावर थर रचून दहीहंडी फोडण्याचा थरार अनुभवायला मिळाला.चिरनेर गावात ग्रीस लावलेल्या मल्लखांब दहीहंडीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. हा अनोखा थरार पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. शनिवारी (दि. १६ ऑगस्ट) पारंपरिक दहीहंडी उत्सवाचे आयोजन झाले. द्वापरयुगापासून चालत आलेली ही परंपरा भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला व लोणी- दहीप्रेमाची आठवण करून देणारी आहे. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ‘राम श्री दहीहंडी’चे आयोजन केले. तसेच महेश बालदी मित्र मंडळासह विविध राजकीय, सामाजिक संस्थांनी उंच उंच दहीहंडीचे सोहळे पार पाडले.उरण तालुक्यातील भेंडखळ, नागांव, गोवठणे आणि कोप्रोली येथील दहीहंडी विशेष आकर्षण ठरल्या. गोविंद पथकांना आयोजकांकडून सन्मानित करण्यात आले.