नेरळ नगरपरिषदेच्या लढाईला वेग ग्रामस्थांचा विकासासाठी निर्धार… नेरळ होणार नगरपरिषद? विकासासाठी एकमुखी पाठिंबा…

0
1

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):- 

नेरळ ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर व्हावे यासाठी ग्रामस्थांनी आरपारची लढाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नेरळ नगरपरिषद चळवळ समितीच्या वतीने बापुराव धारप सभागृहात ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीत निवृत्त पालिका मुख्याधिकारी दादासाहेब अटकोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नेरळ नगरपरिषद स्थापन झाल्यास शासनाकडून मोठा निधी उपलब्ध होईल, नागरी विकासाची कामे वेगाने पूर्ण होतील तसेच माथेरानसारख्या पर्यटनस्थळामुळे केंद्र व राज्य सरकारकडून विशेष निधी मिळण्याची शक्यता वाढेल. बैठकीत विविध ग्रामस्थांनी नेरळमधील प्लास्टिक प्रदूषण,कचरा व्यवस्थापन, रस्त्यावरील आक्रमण, ग्रामपंचायतींचा समावेश, शासनाच्या प्रलंबित प्रस्तावांसह नेरळच्या विकासातील अडथळ्यांवर चर्चा केली.या बैठकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप, आरपीआय, बीएसपी यांसारख्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावून नगरपरिषद स्थापन करण्यासाठी एकमुखी पाठिंबा दर्शवला.नेरळ नगरपरिषद स्थापन झाल्यास निधी, बांधकाम परवानग्या, पर्यटन कर आणि पायाभूत सुविधा यांतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होऊन शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. समितीने राज्य सरकार, एमएमआरडीए आणि रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. नेरळ नगरपरिषद चळवळ समितीचे संतोष पेरणे,अभिषेक कांबळे, संदेश साळुंके तसेच चिराग गुप्ता,ॲड.सम्यक सदावर्ते, प्रीतम गिरी, परेश सुर्वे, विशाल साळुंके, किरण झोमटे, सुरज साळवी, धवल कांबळे, रवींद्र ताम्हाणे, दत्ता ठमके, अनंत भोईर, हेमंत चव्हाण,आदी सदस्यांनी मागील एक वर्षापासून ही समिती करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. या ग्रामस्थांच्या बैठकीला नेरळ गावात अनेक लोक उपस्थित होते.