कोकणात नारळ पाडण्याचे प्रशिक्षण : बळीराज सेनेचा रोजगार निर्मिती उपक्रम

0
6

रत्नागिरी शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

कोकण म्हटले की नारळ व पोफळ्याची बागा हा इथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग मानला जातो. उंचीवर गेलेली नारळीची व पोफळीची झाडे कोकणाचे वैभव वाढवतात. मात्र, या झाडांवर चढून नारळ, सुपारी पाडणारे आणि झाडांची सफाई करणारे कुशल कामगार मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. गुहागर, दापोली, रत्नागिरीसह तळकोकणात नारळ व सुपारीच्या बागा मोठ्या प्रमाणात असतानाही त्यांची देखभाल करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

याच पार्श्वभूमीवर बळीराज सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. कोकणातील युवकांसाठी “नारळी झाडावर चढणे व नारळ पाडणे” याचे संगठित प्रशिक्षण देण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. या माध्यमातून कोकणातील शेतकरी व बागायतदार यांना कुशल कामगार मिळतीलच, शिवाय नव्या पिढीसमोर रोजगाराचे नवे दालन खुले होईल, असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

कांबळे यांनी सांगितले की, हा व्यवसाय उत्तम रोजगाराचे साधन ठरू शकतो. अशिक्षित युवकांनाही सहज उपलब्ध होईल असा हा रोजगार असून, कुशल कामगार साधारणपणे महिन्याला २५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न कमवू शकतो. त्यामुळे बेरोजगार तरुणांना एक स्थिर उत्पन्नाचे साधन मिळेल. या प्रशिक्षणासाठी वयाची अट १८ ते ३० वर्षे अशी ठेवण्यात आली आहे.

कोकण परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. अनेक तरुणांना स्थिर नोकरी किंवा रोजगाराची संधी उपलब्ध नाही. बळीराज सेना यासाठी विशेष पुढाकार घेऊन हे प्रशिक्षण शिबिर राबवणार असून, स्थानिक पदाधिकारी, शेतकरी व बागायतदार यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे केवळ रोजगारच निर्माण होणार नाही तर कोकणातील नारळ व सुपारीच्या बागांची योग्य देखभालही होऊ शकेल.

पराग कांबळे यांनी यामागचा मुख्य उद्देश रोजगार निर्मिती व कोकणातील पारंपरिक व्यवसायाला नवे स्वरूप देणे असा असल्याचे सांगितले. “आम्ही कोकणातील तरुणांना हाताला काम द्यायचे, शेतकऱ्यांना कुशल कामगार उपलब्ध करून द्यायचे आणि या प्रक्रियेत स्थानिक अर्थकारणाला बळ द्यायचे,” असे ते म्हणाले.

बळीराज सेनेच्या या उपक्रमाचे स्वागत स्थानिक स्तरावर होत असून, भविष्यात या प्रशिक्षणाला अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.