नेरळ-कोल्हारेतून पहिल्यांदाच कोकणासाठी बस सेवा… कार्यसम्राट सरपंच महेश विरले यांचा स्वखर्चातील उपक्रम…

0
6

कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-  

कोल्हारे गावचे सरपंच महेश विरले आणि सामाजिक कार्यकर्त्या जोश्नाताई महेश विरले यांनी इतिहासात कधीच न घडलेला उपक्रम राबवून दाखवला आहे. याआधी कोकणात जाण्यासाठी नेरळ किंवा कर्जतहून कोणतीही बस सेवा उपलब्ध नव्हती. परंतु विरले दांपत्यांनी स्वतःच्या पुढाकाराने आणि स्वखर्चातून नेरळ-कोल्हारे येथून कोकणासाठी बससेवा सुरू करून ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण केले आहे. गणपती उत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भक्तांना मुंबई, ठाणे, कल्याण किंवा पनवेल येथून बससेवा घ्यावी लागत होती. मात्र आता प्रथमच नेरळहून थेट कोकणात जाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने गणेशभक्तांमध्ये प्रचंड आनंद आहे. विशेष म्हणजे या बस सेवेचा संपूर्ण खर्च विरले दांपत्यांनी स्वखर्चाने उचलला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्धांना प्रवासात त्रास होऊ नये, ही आमची संकल्पना आहे. म्हणूनच ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे यावेळी महेश विरले यांनी सांगितले.या उपक्रमामुळे ग्रामस्थ व गणेशभक्तांनी कोल्हारे ग्रामपंचायत व विरले कुटुंबाचे आभार मानले असून, अशी सेवा पुढेही सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.