दादरपाडा घरफोडीचा पर्दाफाश…चोरटे पती-पत्नी उरण पोलिसांच्या जाळ्यात…

0
17

उरण शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील):-

उरण तालुक्यातील दादरपाडा भागात घडलेल्या धाडसी घरफोडी प्रकरणाचा उरण पोलिसांनी अल्पवधीत पर्दाफाश करत कुख्यात चोरट्या पती-पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. घरफोडीत तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्यानंतर उमटलेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे सावट होते.परंतु,पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत आरोपी दाम्पत्य जेरबंद झाले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल १४ लाख ५४ हजार ९२८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 8 ऑगस्ट २०२५  रोजी फिर्यादी राजू झुगरे यांच्या उरण तालुक्यातील दादरपाडा येथील घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उचकटून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १३ लाख ७१ हजाराचा  ऐवज चोरून नेला होता. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संताप व घबराट पसरली. तक्रारीनंतर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तातडीने विशेष पथक तयार करण्यात आले.चोरट्या दाम्पत्याची अटक गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पालघर जिल्ह्यातील उमरोळी येथे सापळा रचून नवनीत मधुकर नाईक वयवर्ष  ४५ आणि त्याची पत्नी स्मिता नाईक  वयवर्ष  ४१ या दाम्पत्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांच्या कडुन सोन्याचे व चांदीचे दागिने, रोकड आणि अन्य ऐवज असा एकूण 14.54 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.या दाम्पत्याने केवळ रायगडच नव्हे तर नवी मुंबई, कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मालिका घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात आधीपासूनच तब्बल २२ गुन्ह्यांची नोंद असून त्यांनी यापूर्वी तुरुंगवासही भोगला आहे. त्यामुळे परिसरात सक्रिय असलेल्या या दाम्पत्याच्या अटकेमुळे जनतेत दिलासा मिळाला आहे.पोलिसांची धडाकेबाज कारवाई या संपूर्ण कारवाईत डीसीपी अमित काळे, एसीपी किशोर गायके यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी, पोलीस निरीक्षक राहुल काटवाणी, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील जवानांनी सहभाग घेतला.पोलिसांच्या या तात्काळ व प्रभावी कारवाईबद्दल उरण परिसरातील नागरिकांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली आहे.नागरिकांना आवाहन दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना घर सुरक्षित
ठेवण्याचे, तसेच परक्या व्यक्तींवर सहज विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. घरफोडीच्या संशयास्पद हालचाली दिसताच तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.