श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (संदेश पेडणेकर):-
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात सात दिवसांच्या गणेशोत्सवाचा समारोप मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात झाला. ढोल-ताशांच्या गजरात, सनई-चौघड्यांच्या सुरात आणि भक्तीगीतांच्या वातावरणात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
विविध गावांमध्ये भाविकांनी आपल्या बाप्पाला नाचत-गात, टाळ-ढोलांच्या तालावर जल्लोषात निरोप दिला. काही गावांमध्ये नदीकाठी तर काही ठिकाणी समुद्रकिनारी विसर्जनाची सुंदर सोहळा पार पडला. हजारो भाविकांनी बाप्पाच्या मिरवणुकीत सहभाग घेत, “गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!” या गजरात श्रीगणेशाला निरोप दिला.भक्तांच्या चेहऱ्यावर बाप्पाला निरोप देताना भावनिक वातावरण दिसून आले. श्रीवर्धनसह आसपासच्या गावांमध्ये दिवसभर टाळ-ढोल, फटाके, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिगीतांचा उत्सवमय माहोल अनुभवायला मिळाला.