गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू… आनंद उत्सवात शोककळा…अनिल बुधा नाईक बुडून मृत्युमुखी…

0
2

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

अलिबाग तालुक्यातील झिराड येथे गणपती विसर्जनाच्या वेळी अनिल बुधा नाईक (वय ४४, रा. झिराड आदिवासी वाडी, ता. अलिबाग) यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद त्यांची पत्नी आशा अनिल नाईक (वय ४३) यांनी मांडवा सागरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ठाकूर आळी (झिराड ग्रामपंचायत हद्दीत) येथील तलावात गौरी गणपती विसर्जन सुरू असताना अनिल नाईक हे आपल्या सहकाऱ्यांसोबत सहभागी झाले होते. विसर्जनानंतर ते घरी परतले नाहीत. त्यांच्या शोधादरम्यान विसर्जन स्थळी त्यांचा टी-शर्ट आणि चप्पल आढळून आली.

यानंतर मांडवा पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात शोधमोहीम सुरू केली. मात्र मृतदेह मिळाला नाही. अखेर ३ सप्टेंबर रोजी रोहा रेस्क्यू टीमच्या मदतीने शोध घेण्यात आला आणि चोवीस तासांनी म्हणजेच सायंकाळी सव्वा पाच वाजता अनिल नाईक यांचा मृतदेह सापडला.

मृतदेह बाहेर काढून अलिबाग जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या प्रकरणी मांडवा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिद करीत आहेत.