गडहिंग्लज/मुंबई शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
मराठा समाजाच्या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचा ऐतिहासिक विजय अखेर साजरा करण्याचा क्षण आला. मुंबई येथे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाच्या रणभूमीवर लढणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जिद्दीला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिल्यानंतर संपूर्ण राज्यात आनंदाचा उधाण आले. या विजयाच्या जल्लोषात गडहिंग्लज शहरही मागे राहिले नाही.
गडहिंग्लज सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवार दि. 03 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11:30 वा. भव्य उत्सव साजरा करण्यात आला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन झाले.
यानंतर चौकात “एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जरांगे साहेबांचा विजय असो, हर हर महादेव” या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी, मिठाईचे वाटप, गुलालाची उधळण आणि आनंदाचा उत्सव झगमगाटला. वाहनधारक, पादचारी यांनाही लाडू देऊन या सोहळ्यात सहभागी करून घेण्यात आले. खऱ्या अर्थाने गडहिंग्लज चौक हा आनंदाचा महासागर बनला.
विजयोत्सवात प्रामुख्याने किरण कदम (अध्यक्ष, सकल मराठा समाज), नागेश चौगुले (जिल्हाध्यक्ष, मनसे), आप्पासो शिवणे, युवराज बरगे, तानाजी कुराडे, शिवाजी कुराडे, एल. डी. पोवार साहेब, सरदेसाई सर, जगदीश पाटील, उत्तम देसाई, नाथा रेगडे, प्रा. शिवाजीराव भुकेले, अमरसिंह चव्हाण व ॲड. दिग्विजय कुराडे यांची उपस्थिती होती.
या जल्लोषमय सभेने मराठा समाजाची एकता, जिद्द आणि आरक्षण हक्कासाठीचा अविचल संघर्ष पुन्हा अधोरेखित केला. गडहिंग्लज शहर आज विजयाच्या या सोहळ्याने भारावून गेले.
मराठा समाजाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला असून, जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे मिळालेल्या या यशाने गडहिंग्लजमध्ये अभिमान, उत्साह आणि समाधानाचा अविस्मरणीय क्षण निर्माण केला.