विमानतळाला दि. बा. पाटीलांचेच नाव अन्यथा आकाश ठप्प करु… सरकार सावधान…विमानतळ नामकरणाचा लढा आता रणसंग्रामात…

0
1

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी भिवंडी ते जासई या मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या दिबा मानवंदना कार रॅली निरोप समारंभाला जनसागर लोटला.भिवंडी, ठाणे,पालघर, वसई, नवी मुंबई, रायगड या भागातून आलेल्या हजारो नागरिकांनी, विविध राजकीय नेते, सामाजिक संघटना व स्थानिक पदाधिकाऱ्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव मिळाले पाहिजे…शेतकरी-कामगारांचा सन्मान झाला पाहिजे…सरकार झुकलेच पाहिजे…अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.विमानतळाला दि. बा. पाटील साहेबांचे नाव मिळालेच पाहिजे, ही एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. जर सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर या विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला. याचबरोबर, येत्या १५ दिवसांत याहूनही मोठे आंदोलन उभारून सरकारला झुकवण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला…

दि. बा. पाटील हे केवळ एक नाव नाही, तर शेतकरी, कामगार, आदिवासी आणि सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीचे प्रतीक आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला त्यांचेच नाव देणे हे न्याय्य असून, ती जनतेची खरी मागणी आहे.

या आंदोलनाला खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय दिना पाटील, मा.आमदार जयंत पाटील, मा. आमदार राजू पाटील, मा. आमदार बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड-पनवेल शिरीष घरत, शेकापचे राजेंद्र पाटील, उपनेते बबनदादा पाटील, अतुल म्हात्रे उपस्थित होते…