रायगडच्या पवित्र भूमीवर लेडीज बार व अवैध धंद्यांचा धुमाकूळ… खालापूर तालुक्यात रात्री उशिरापर्यंत लेडीज बार सुरू…

0
29

कर्जत शिवसत्ता टाइम्स (नरेश जाधव):- 

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींनी नटलेल्या रायगड जिल्ह्याच्या भूमीत आज अवैध धंदे, अंमली पदार्थांची विक्री आणि लेडीज बारसारखे प्रकार सुरू असल्याने तरुणाई नशेच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे, अशी गंभीर परिस्थिती समोर आली आहे.

खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आणि लेडीज बार चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः खालापूर तालुक्याच्या हद्दीत असलेला ‘समुद्र लेडीज बार’ हा थेट महामार्गालगत सुरू असून, रात्री उशिरापर्यंत सुरु राहतो. या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता कायम असते. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या बारमध्ये महिलांशी संबंधित चुकीचे व अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

या सर्व बाबींचा निषेध व्यक्त करत स्वराज्य संविधान रक्षक सेना (पॅंथर आर्मी) यांनी अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा या पवित्र रायगड जिल्ह्यातील युवकांच्या भवितव्याशी खेळणारे हे धंदे थांबणार नसल्यास संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल वसंत नेहुल यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद झाले नाहीत, तर त्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असेल.यावेळी संघटनेचे पदाधिकारी रायगड जिल्हा उपाध्यक्ष पँथर आशिष भाई खंडागळे, रायगड जिल्हा सचिव पँथर आदित्य भाई कदम, तालुका उपाध्यक्ष भूषण भाई गायकवाड आणि तालुका संघटक मंगेश भाई शेंडे उपस्थित होते.