चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
स्वच्छता हीच खरी सेवा आहे,आपला परिसर प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ ठेवल्यास तीच खरी सेवा होईल,असे प्रतिपादन भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे संचालक महेश भैसे यांनी केले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत भारतीय भूवैज्ञानिक संस्था भारत सरकार पुणे विभाग आणि ग्रुप ग्रामपंचायत चौक यांच्या सहकार्याने इरसाल वाडीच्या पायथ्याशी असलेल्या नम्राची वाडी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले, त्या प्रसंगी संचालक महेश भैसे मार्गदर्शन करताना बोलत होते.ग्रुप ग्रामपंचायत चौक सरपंच रितू ठोंबरे यांनी उपस्थित सर्व टीमचे स्वागत करून ग्रामपंचायत यांना स्वच्छता अभियान राबविण्यात मदत आणि मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त केले.स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यापूर्वी इरसाल वाडी दुर्घटनाग्रस्त यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (Geological Survey of India-GSI) ही भारत सरकारची एक वैज्ञानिक संस्था आहे.भारत सरकारच्या खनिज मंत्रालयाच्या अंतर्गत येते.या संस्थेची स्थापना १८५१ साली करण्यात आली.तिचा मुख्य कार्य राष्ट्रीय भूवैज्ञानिक डेटा आणि खनिज संसाधनांचे मूल्यांकन करणे, तसेच भू-तांत्रिक आणि भू-पर्यावरणीय अभ्यास करणे आहे.
आपल्या सेवा पंधरवडाची माहिती देताना स्वच्छता आणि कार्यक्षमता सुधारणे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि सौंदर्यपूर्ण बनवून जनतेसाठी चांगले वातावरण निर्माण करणे, सफाई मित्रांचे महत्त्व सांगणे व त्यांच्या योगदानाची दखल घेणे, स्वच्छता आणि पर्यावरणा बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उत्सव हिरवे आणि स्वच्छ उपक्रम यावर भर देणे, स्वच्छतेच्या महत्त्व पटवून देणे यासाठी जनजागृती करून लोकांना स्वच्छ भारताच्या ध्येयात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश असल्याची माहिती महेश भैसे यांनी दिली.वेळी नम्राची वाडी,नवीन इरसाल वाडी येथे स्वच्छता करण्यात आली.यावेळी प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले. गटार परिसर स्वच्छ करून जंतू नाशक पावडर पसरवण्यात आली.सांडपाणी व्यवस्थापन, ओला कचरा, सुखा कचरा संकलन व त्याचे व्यवस्थापन, प्लास्टिक चे दुष्परिणाम याची माहिती देण्यात आली.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रुप ग्रामपंचायत चौक येथे सुरू असून हे अभियान एक सेवाव्रत अभियान म्हणून राबविण्यात येत असल्याचे ग्राम पंचायत अधिकारी गणेश मोरे यांनी दिली.तर सेवा पंधरवडा माध्यमातून जनहिताची कार्य मार्गी लागली जात आहेत,असे महसूल मंडळ अधिकारी माणिक सानप यांनी सांगितले.भारतीय भूजल सर्वेक्षण विभागातील सुमारे पन्नास जणांनी या अभियानात भाग घेऊन ग्रुप ग्रामपंचायत चौक यांचे कर्मचारी,नम्राची वाडी ग्रामस्थ यांच्या बरोबर मोठ्या प्रमाणात श्रमदान केले.ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी वाघ,महसूल अधिकारी अक्षय गावडे,अंकुश वाघ,ग्रामस्थ उपस्थित होते.

