चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
खालापूर तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत वडगांव यांच्या माध्यमातून एक दिवस,एक तास,एक साथ या घोष वाक्याने महाश्रमदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, यावेळी या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत वडगांव यांनी महाश्रमदान मोहीम यशस्वीरित्या राबविली.विशेष म्हणजे माझी वसुंधरा अभियान ४.० व ५.० मध्ये कोकण विभागात प्रथम येऊन राज्य स्थरावर पारितोषिक प्राप्त केले आहे.हे सातत्य कायम ठेवण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत वडगांव सर्व स्तरातून प्रयत्न करताना दिसत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले एक महत्वाकांक्षी अभियान आहे, जे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि गावांचा शाश्वत विकास साधण्यासाठी चालवले जात आहे .या अभियानात सुशासन, जलसमृद्धता, स्वच्छता, हरित विकास आणि सक्षम पंचायत यांसारख्या सात प्रमुख घटकांचा समावेश आहे आणि या स्तरांवर ग्राम पंचायत वडगांव काम करीत आहे.
या स्वच्छता अभियानात सार्वजनिक ठिकाणे, ग्राम पंचायत हद्दीतील पर्यटन स्थळे,अध्यात्मिक स्थळे,नदी किनारे, संस्थात्मक इमारती, कार्यालये, वारसा स्थळे,उद्याने यांची स्वच्छता करण्यात आली.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे ग्राम विकास अधिकारी सुहास वारे यांनी सांगितले.या अभियानात पारनेर विद्यालय विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी,महिला बचत गट,ग्रामस्थ,सी.आर.पी.,अंगणवाडी सेविका, मदतनीस,शिक्षक तसेच कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थी यांचा मोठा सहभाग आहे असे ग्रामपंचायत अधिकारी सुहास वारे यांनी सांगितले…

