चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
खोपोली-पाली रस्त्यावर केमिकल टँकर लीक; पोलिस आणि हेल्फ फाऊंडेशनच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला…काल (रविवार) रात्री साधारण १० वाजता खोपोली-पाली रस्त्यावर कारगावजवळ MH 46/F/5010 हा केमिकल टँकर लीक झाल्याची माहिती खालापूर पोलिसांना व हेल्फ फाऊंडेशनला मिळाली.धक्कादायक बाब म्हणजे टँकर चालकाने गाडी सोडून पलायन केल्याचे समजले. प्राथमिक माहितीनुसार, हा टँकर महाडहून निघालेला होता. चालकाने पुन्हा गाडी ताब्यात घेतली असता खोपोलीच्या दिशेने जाताना रस्त्याच्या चढणीवर केमिकल गळती सुरू झाली. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आणि रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला. सुदैवाने स्थानिक युवकांनी तत्काळ मदतकार्य करत परिस्थिती आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. गुरुनाथ साठेलकर यांच्या हेल्फ फाऊंडेशनचे धनंजय गीध, अमित विचारे यांनीही मदतकार्य हाती घेतले. पोलिसांनी तातडीने AMNS व TATA स्टीलच्या फायर टेंडरना बोलावले.नंतर सदर टँकर ॲडलॅब इमॅजिका जवळ पोलिसांनी थांबवला. परिस्थितीनुरूप निर्णय घेत, तो टँकर ढेकू येथील कंपनीत सुरक्षेसह अनलोड करण्यात आला. या वेळी दोन्ही फायर ब्रिगेडच्या गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या कार्यवाहीत हेल्फ फाऊंडेशनचे धनंजय गीध, पंकज बागुल, सौरभ घरत, अमित विचारे, निलेश यादव, रवी पाटील, हनीफ कर्जीकर यांनी सहकार्य केले. त्यांच्या तत्परतेचे पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी कौतुक केले. तसेच AMNS आणि TATA स्टीलच्या फायर टीमचेही आभार मानले.स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

