विषारी सापाचा कहर शेतकरी पांडुरंग म्हसकर यांचा शेतातच जागीच मृत्यू!….

0
3

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील सोन्याची वाडी भागात सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका शेतकऱ्याचा विषारी साप चावल्‍याने मृत्यू झाला.

मृत शेतकऱ्याचे नाव पांडुरंग धोंडू म्हस्कर (वय ६५) असे असून, ते आपल्या शेतात काम करीत असताना अचानक विषारी सापाने चावल्‍याने काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. साप चावल्‍यावर आसपासचे शेतकरी तत्काळ धावले, मात्र अत्यंत विषारी असलेल्या त्या सापाचा मागमूस लागला नाही आणि प्राथमिक उपचाराची कोणतीही संधी मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार रावसाहेब कोळेकर व पोलिस कर्मचारी कदम तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी शेतकऱ्याला रुग्णवाहिकेतून माणगाव सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

युवक महेश तळवटकर यांनीही या प्रसंगी पुढाकार घेत पोलिसांना सहकार्य केले. मात्र डॉक्टरांनी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेतकरी म्हस्कर यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, साप अत्यंत विषारी होता आणि चावल्यावर काही क्षणांतच विष संपूर्ण शरीरात पसरले, ज्यामुळे शेतकऱ्याचा त्वरित मृत्यू झाला.दरम्यान, समाजसेवक संतोष खाडे हेही या गंभीर प्रसंगी रुग्णालयात उपस्थित होते आणि त्यांनी संबंधित कुटुंबीयांना दिलासा दिला.

या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यानंतरच्या हंगामात शेतात काम करताना विषारी सापांचा वाढलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.