मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
दिवाळी उत्सवानंतर महाराष्ट्रात निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आता जवळपास निश्चित मानली जात आहे.राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या सर्व निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचा विचार राज्य निवडणूक आयोगाच्या स्तरावर सुरू आहे.जाणून घेऊयात याचसंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट… निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईव्हीएम (मतयंत्रे) पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे तांत्रिक दृष्ट्या एकाच वेळी राज्यभर निवडणुका घेणे शक्य आहे. त्यामुळे आयोगाने या पर्यायावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे.यावेळी निवडणुका घेताना प्रशासनाला मोठा ताण येणार असला तरी सर्व यंत्रणा सज्ज आहेत, असेही संकेत दिले जात आहेत. मात्र, आयोगाने काही जिल्ह्यांमधील परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांमध्ये अलीकडील अतिवृष्टीमुळे रस्ते, पायाभूत सुविधा आणि मतदार केंद्रांच्या स्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी आयोगाने जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवण्याचे आदेश दिले आहेत. राजकीयदृष्ट्या पाहता या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण, या निवडणुकांच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाला जनतेचा नवा कौल मिळणार आहे. सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारसाठी या निवडणुका म्हणजे जनतेसमोरचा पहिला मोठा कसोटीचा क्षण ठरणार आहे. तर, विरोधक महाविकास आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे गट हे देखील आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहेत. राज्यभरात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, अनेक ठिकाणी गठबंधन, उमेदवारी, आणि स्थानिक पातळीवरील मतदारसंघ गणितांवर चर्चा सुरू झाली आहे. दिवाळी संपताच या निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर, दिवाळीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा “मतांचा महासंग्राम” पाहायला मिळणार आहे. ग्रामीण ते शहरी स्तरावर सत्तेसाठीची ही झुंज राजकीय वातावरण आणखी तापवणार आहे.