रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून मोठा तणाव निर्माण झाला आहे…भारतीय जनता पक्षाने मांडलेल्या सूत्रानुसार भाजपला २४, शिवसेना (शिंदे गट) ला २४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त ११ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला.मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रस्ताव ठामपणे नाकारला असून,आम्हाला किमान २० जागा मिळाल्याशिवाय युती शक्य नाही असा स्पष्ट पवित्रा घेतला आहे.
भाजपने हे गणित जिल्ह्यातील आमदारसंख्येवर आधारित केले आहे. रायगडमध्ये भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी ३ आमदार आहेत, तर राष्ट्रवादीकडे एक आमदार आणि एक खासदार आहे.त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी २४ जागा आणि राष्ट्रवादीला ११ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.मात्र राष्ट्रवादीने हा हिशोब फेटाळला.दक्षिण रायगडमध्ये आमचा प्रभाव प्रबळ आहे तळे, माणगाव, महाड, पोलादपूर, खोपोली आणि कर्जत या भागात आमचं संघटन मजबूत आहे, असं सांगत राष्ट्रवादीने समान जागावाटपाची मागणी कायम ठेवली.
भाजप आणि शिवसेनेने मात्र राष्ट्रवादीच्या मागणीस नकार दिला.त्यांच्या म्हणण्यानुसार,आमचं संघटन मोठं आहे,कार्यकर्त्यांचा संपर्क चांगला आहे आणि जनाधार वाढला आहे,त्यामुळे समान वाटप शक्य नाही.शिवसेनेने सांगितलं की,किनारी आणि मध्य रायगडमध्ये आमचं मजबूत जाळं आहे,तर भाजपने उत्तर रायगडमध्ये आम्ही प्रभावशाली आहोत,असा दावा केला आहे.
या वादामुळे महायुतीचं गणित बिघडले असून, तिन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने जिल्हास्तरीय रणनीती बैठका घेण्यास सुरुवात केली आहे, शिवसेनेने स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांशी थेट संपर्क वाढवण्याचे आदेश दिले आहेत,तर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर सत्ता आणू या घोषवाक्याने प्रचार मोहिमेची सुरुवात केली आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या मते,सध्या महायुती होण्याची शक्यता फार कमी आहे.मात्र, निवडणुकीनंतर निकालानुसार नवी सत्तासमीकरणे उभी राहू शकतात.रायगड जिल्ह्यात ५९ जागा आहेत,आणि भाजप उत्तर रायगडमध्ये,राष्ट्रवादी दक्षिणेत, तर शिवसेना किनारी भागात प्रभावी आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा हा तिढा “राजकीय शतरंज” ठरू शकतो, अशी चर्चा रायगड जिल्ह्यात सुरू आहे.

