रेल्वे जंक्शन, पूरमुक्ती व विकासाच्या मागणीसाठी महाडकरांचा आवाज  शरद पवार पक्षाचे पराग वडके उपोषणास…

0
5

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या महाड शहराला रेल्वे जंक्शनचा दर्जा देण्याच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) चे महाड शहराध्यक्ष पराग पद्माकर वडके यांनी २९ ऑक्टोबर २०२५, बुधवारपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

वडके यांनी या मागणीसाठी २७ ऑक्टोबर रोजी महाड येथील प्रांताधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर स्मरणपत्र सादर केले असून, तसेच एक प्रत प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे.

सदर स्मरणपत्रात वडके यांनी नमूद केले आहे की, महाड हे केवळ ऐतिहासिक नव्हे तर सामाजिक व आर्थिक दृष्ट्याही केंद्रबिंदू असलेले शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीशी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळे सत्याग्रहाशी महाडचे नाव अविच्छिन्नपणे जोडले गेले आहे.

महाडला रेल्वे जंक्शनचा दर्जा मिळाल्यास

* स्थानिक उद्योगांना (एमआयडीसी) आणि व्यापाऱ्यांना वाहतुकीचा मोठा लाभ होईल,
* विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण केंद्रांपर्यंत सुलभ प्रवासाची संधी मिळेल,
* तसेच पर्यटकांना ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणे सुलभ होईल.

याशिवाय वडके यांनी दासगाव–गोंठे दरम्यान असलेल्या पुलामुळे दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या पूरग्रस्त पुलाऐवजी मुंबई–गोवा महामार्गालगत नवीन रेल्वेमार्ग उभारण्याची मागणी केली असून, त्यामुळे महाड कायमस्वरूपी पूरमुक्त राहील आणि शहराच्या शिक्षण, व्यापार व पर्यटन क्षेत्राला नवे बळ मिळेल, असा त्यांनी दावा केला आहे.

तसेच महाड–वीर–सापे–करंजवाडी–विनोरे या मार्गावर नवीन रेल्वे लाईन उभारण्याची दशकांपासूनची लोकांची मागणी शासनाने तातडीने मान्य करावी, अशी मागणीही वडके यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) रायगड जिल्हाध्यक्ष श्री. रवींद्र हरिचंद्र चौव्हाण यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. “महाड शहराध्यक्ष पराग वडके यांनी जनतेच्या सामाजिक मागणीसाठी घेतलेला पुढाकार हा पक्षासाठी अभिमानास्पद असून, समाजहिताच्या लढ्याला आमचा संपूर्ण पाठिंबा राहील,” असे रवींद्र चौव्हाण यांनी सांगितले. त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना या आंदोलनाचे स्वागत करत वडके यांच्या निर्धाराचे कौतुक केले.

महाडच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास, पराग वडके यांनी जाहीर केल्याप्रमाणे २९ ऑक्टोबरपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अमरण उपोषणास बसण्याचा निर्णय कायम ठेवला असल्याचे स्पष्ट केले आहे.