एक शंका, एक चौकशी, आणि सतत वाजणारा मोबाईल प्रवासी न उचलला, पण कंडक्टरने उचलली माणुसकी!”

0
4

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

मोबाईल हरवणे ही गोष्ट आजच्या काळात काही नवीन नाही.पण नुकत्याच घडलेल्या घटनेत एका प्रामाणिक सरकारी बस कंडक्टरने दाखवलेल्या सतर्कतेमुळे व जबाबदार वृत्तीमुळे एक महागडा मोबाईल त्याच्या खऱ्या मालकापर्यंत सुखरूप पोहोचला. ही घटना केवळ हरवलेला मोबाईल परत मिळाल्याची नाही,तर प्रामाणिकतेचं जिवंत उदाहरण ठरली आहे.

ही घटना दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये घडली. संबंधित बस क्रमांक एम. एच. २० बी. एल. १७२० ही खेड–चिंचवड मार्गावर प्रवास करत होती. बसचे चालक ए. यू. पोळ (क्रमांक १५०९९) तर वाहक एस. बी. शिरसाट (क्रमांक ११०२५९) होते.प्रवासादरम्यान मुळशी येथे दोन प्रवासी बसमध्ये चढले आणि पाऊड येथे उतरले. या प्रवाशांनी अनवधानाने आपला मोबाईल व पर्स मागच्या सीटखाली विसरून दिला. बस पुढे निघून गेल्यानंतर काही वेळाने त्यांना वस्तू हरवल्याची जाणीव झाली, परंतु तोपर्यंत बस बऱ्याच अंतरावर गेली होती.

दरम्यान, बसमध्ये कंडक्टरच्या कानावर सतत वाजणाऱ्या मोबाईलच्या रिंगचा आवाज येत होता. आश्चर्य म्हणजे, ज्या प्रवाशाकडे तो मोबाईल होता, तो सतत वाजणारा फोन उचलत नव्हता. त्यामुळे कंडक्टरला शंका आली आणि त्याने त्या प्रवाशाला विचारणा केली की, “फोन का उचलत नाहीत?मात्र त्या प्रवाशाने कोणताही स्पष्ट उत्तर दिले नाही. कंडक्टरने मोबाईल स्वतःकडे घेत तपासणी केली असता, त्या मोबाईलवर २५ पेक्षा अधिक मिस्ड कॉल्स आल्याचे दिसून आले. त्यामुळे मोबाईल त्या प्रवाशाचा नसावा असा संशय अधिकच बळावला. काही क्षणांनी पुन्हा एक कॉल आला २६ वा कॉल तेव्हा कंडक्टरने स्वतः तो कॉल रिसीव्ह केला. समोरून मोबाईलचा खरी मालक बोलत होता. त्याला कंडक्टरने शांतपणे समजावून सांगितले की, “आपला मोबाईल सुरक्षित आहे, कृपया पुढील एस.टी. बसस्थानकावर येऊन घ्या.”

दरम्यान, त्या बसमधील आसनाखाली तपासणी करताना कंडक्टरला एक पर्स देखील सापडली. त्यामुळे संपूर्ण प्रकार स्पष्ट झाला. बस ठरलेल्या स्थानकावर पोहोचल्यावर मोबाईल व पर्सचा मालक ओळखपत्रासह उपस्थित झाला. स्थानक प्रमुख भोसले साहेब तसेच सुरक्षा रक्षक ए. एस. भोसले यांच्या उपस्थितीत मोबाईल व पर्स सुपूर्द करण्यात आले. ही सुपूर्दगी सायं. ५.३० वाजता (१७.३०) करण्यात आली.मोबाईल मिळाल्यानंतर आनंदित झालेल्या प्रवाशाने कंडक्टरचे मनःपूर्वक आभार मानले व त्याच्या प्रामाणिकपणाचे भरभरून कौतुक केले. त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि दिलासा स्पष्ट दिसत होता.

विशेष म्हणजे, याच कंडक्टरने काही वर्षांपूर्वीही अशीच घटना अनुभवली होती. मुंबई–गोवा महामार्गावरील शिवशाही वातानुकूलित बसमध्ये एका प्रवाशाचा मोबाईल हरवला होता. तो प्रवासी मुंबईत उतरून गेला होता,पण काही तासांनंतर तो मोबाईल बसच्या दरवाज्याजवळ सापडला. महामार्गावरील खड्यांमुळे तो मोबाईल हळूहळू पुढे सरकत बसच्या पुढील बाजूस पोहोचल्याचे तेव्हा निदर्शनास आले होते.या दोन्ही घटनांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते.प्रामाणिकपणा, सतर्कता आणि कर्तव्यनिष्ठा आजही आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत जिवंत आहे.