रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
तळा पोलिसांनी अत्यंत वेगवान आणि प्रभावी तपास करून खोट्या नावाने फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करून गुन्हा उकलला आहे. सरकारी नोकरी व घरकुल मिळवून देण्याचे आमिष दाखवून सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या आरोपीला केवळ काही दिवसांत पकडण्यात तळा पोलिसांना यश आले आहे. या संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश मो. गवई यांनी दाखविलेली तत्परता, तपासातील काटेकोरपणा आणि उत्कृष्ट नेतृत्व यामुळे गुन्हा अल्पावधीत उकलण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी उर्मिला परशुराम नाडकर (वय ५० वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. बारपे, ता. तळा, जि. रायगड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुरेश सुडक्या गवसकर (वय ४७ वर्षे, रा. भिंताड, पोस्ट नागाव, ता. माणगाव, जि. रायगड) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घटना दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता फिर्यादी यांच्या राहत्या घरी घडली.आरोपीने स्वतःची ओळख ‘विजय दळवी’ अशी करून देत, तो तहसीलदार कार्यालय, तळा येथे नोकरीस असल्याचे सांगितले. त्याने फिर्यादींना सरकारी घरकुल मिळवून देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला आणि फिर्यादींकडून ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व ४ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या कुड्या घेतल्या.
यानंतर आरोपी फरार झाला. मात्र, एपीआय सतीश मो. गवई यांच्या मार्गदर्शनाखाली तळा पोलिसांनी तपासाला गती देत केवळ काही दिवसांत आरोपीचा माग काढला आणि दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.५६ वाजता त्यास अटक केली. पुढील तपास सतीश गवई यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, गुन्ह्यातील इतर बाबींची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाच्या जलद उकलसाठी तळा पोलिसांचे, विशेषतः एपीआय सतीश मो. गवई यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या धडाडीच्या आणि जबाबदार भूमिकेचे स्वागत केले असून, तळा पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपली दक्षता आणि बांधिलकी सिद्ध केली आहे.

