खा.सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे रायगड दौर्‍यावर महाड रेल्वे जंक्शनसाठी निर्णायक बैठक आज…

0
20

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-  

महाड शहरासाठी कोकण रेल्वे जंक्शन मिळावे,या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसंदर्भात महाड तहसीलदार यांच्या पुढाकाराने मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस कोकण रेल्वे (रत्नागिरी विभाग) अधिकारी, महाड पोलिस निरीक्षक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र हरीचंद्र चव्हाण, महाड शहराध्यक्ष पराग वडके तसेच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या मागणीसाठी पराग वडके यांनी रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच आमरण उपोषण केले होते. त्यानंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदारांनी ही निर्णायक बैठक बोलावली आहे. त्यांच्या या तत्पर व लोकाभिमुख पवित्र्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करत राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाला याची माहिती दिली व खा. सुरेश (बाळ्या मामा) गोपीनाथ म्हात्रे यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या विनंतीला मान देत खा. म्हात्रे हे आज रायगड दौर्‍यावर असून, या बैठकीस हजेरी लावणार आहेत.

महाडकरांच्या स्वप्नातील रेल्वे जंक्शन मिळविण्याच्या दिशेने ही बैठक एक निर्णायक पाऊल ठरणार आहे. तहसीलदारांचा लोकाभिमुख दृष्टिकोन आणि रवींद्र चव्हाण यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहे.