रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची, बळिराजाच्या कष्टांची ही भूमी! एकेकाळी शालीनतेसाठी, विचारप्रधानतेसाठी आणि राजकीय संस्कारांसाठी ओळखला जाणारा रायगड आज मात्र राजकीय गलिच्छपणाने बदनाम होत चालला आहे. लोकशाहीचा पाया ज्याठिकाणी विचारांवर बांधला गेला,त्या भूमीवर आता वैयक्तिक हल्ले, अपशब्द आणि सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे राजकारण दिसतंय. पूर्वीचे नेते विचारांनी लढायचे परिपक्वता,सभ्यता आणि आदर त्यांच्या शब्दांत जाणवायचा. विरोधकांवर टीका केली तरी मर्यादा राखायची.पण आता? मर्यादा मोडल्या गेल्या आहेत! सभागृहात आणि जनसभांमध्ये शब्दांचा सन्मान संपला आहे. विचार हरवले आणि टोमण्यांचा बाजार भरलाय. या सगळ्या गोंधळात अजूनही काही नेते सभ्यतेची ओळख जपतात. त्यात खासदार सुनील तटकरे यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी कधीच वैयक्तिक हल्ले केले नाहीत. उलट रायगडच्या विकासाच्या प्रश्नांवर रस्ते, दिघी बंदर, औद्योगिक गुंतवणूक, रोजगार, पर्यटन, दिल्ली-मुंबई कॉरिडॉर, मराठी भाषा, पर्यावरणसंवर्धन यावर सातत्याने आवाज उठवला. त्यांची भाषा सभ्य, पण मुद्देसूद आहे. त्यांचा सूर संघर्षाचा नाही, तर विकासाचा आहे. पण जिल्ह्यातील इतर काही नेते?विचारांऐवजी एकमेकांवर आरोप, धमक्या, आणि अगदी मारहाण! ही लोकशाहीची शोकांतिका नाही तर लाजिरवाणी अवस्था आहे. राजकारण हे लोकहिताचे माध्यम असायला हवे, पण आज ते सत्तेचा बाजार बनले आहे.पदलालसा, पक्षांतर, खोटी आश्वासने आणि निवडणुकीच्या आधी मतदारांना भूलथापा एवढ्यावरच मर्यादित झालंय राजकारण.आज प्रश्न असा आहे हा तोच रायगड आहे का, जिथे मतभेद असूनही सन्मान होता ? जिथे समाजसेवा हेच राजकारण होतं?आजची पिढी या राजकारणाकडून प्रेरणा घेईल की तिरस्कार?जर हे असंच सुरू राहिलं, तर पुढची पिढी सभ्यतेचे धडे कुणाकडून शिकणार?रायगडच्या लोकशाहीला पुन्हा विचार, संस्कार आणि सभ्यतेचा श्वास द्यायचा असेल तर नागरिकांनी जागं व्हायला हवं!टीका करा, पण विचारांवर करा.लोकशाही वाचवायची असेल, तर सभ्यतेचा पुनर्जन्म घडवावाच लागेल.कारण राजकारण सभ्य असेल तरच समाज प्रगत होतो; आणि राजकारण खालच्या पातळीवर गेलं, तर समाज अंधारात हरवतो.”

