उरण नगरपरिषदेत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी थेट लढत… उरण नगरपरिषद निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी चौकोनी लढत…

0
37

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):- 

उरण नगरपरिषद निवडणुकीत २१ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख संपताच संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी आता ४ उमेदवार, तर नगरसेवक पदाच्या २१ जागांसाठी ४८ उमेदवार अंतिम रिंगणात असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.अर्ज मागे घेतल्यानंतर उरणमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट टक्कर रंगली आहे.मात्र शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष उमेदवारांच्या प्रवेशामुळे अनेक प्रभागांत बहुकोनी लढती निर्माण झाल्या असून निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शोभा कौशिक शहा कोळी, महाविकास आघाडीकडून भावना कुंदन घाणेकर, शिंदे गटाकडून रुपाली तुषार ठाकूर,तर अपक्ष म्हणून शेख नसरीन इसरार यांची नावे अंतिम आहेत.चारही उमेदवार आपापल्या गटात ताकदीने जनसंपर्क करत असून ही चौकोनी लढत शहराच्या राजकीय समीकरणात मोठा ताण निर्माण करणार आहे.

नगरसेवकांच्या २१ जागांसाठी सर्व प्रभागांतून नावांची अंतिम यादी निश्चित झाली.काही जणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर स्पर्धा सुटसुटीत झाल्यासारखी वाटत असली तरी प्रत्यक्षात बहुकोनी लढती, स्थानिक गटांचं गणित आणि जातीय–समुदायीय मतांचे तिढे निवडणुकीचं चित्र अधिक गुंतागुंतीचं करत आहेत.काही प्रभागांत भाजप आणि महाविकास आघाडीची सरळ टक्कर आहे; तर काही भागांत शिंदे गट व अपक्ष उमेदवार निर्णायक भूमिका घेऊ शकतात.उरण शहरातील स्थानिक प्रश्न या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव, पाणीपुरवठा आणि अस्वच्छ पाणी, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा,अपघातांचा वाढता धोका, तलाव सुशोभीकरण, करप्रणाली असे मुद्दे मतदारांच्या अजेंड्यावर आहेत.आता उमेदवार स्पष्ट झाल्याने येत्या काही दिवसांत प्रचार तापणार हे निश्चित.उरणकरांचा कौल कोणाला मिळतो हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष या तुफानी निवडणुकीकडे लागले आहे.