रस्त्यावर पकडलेल्या मगरीनंतरही तलावात हालचाल नेमक्या किती मगरी ?

0
5

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

माणगावातील खांदाड गावात पुन्हा एकदा मगरींच्या उपस्थितीने ग्रामस्थांच्या चिंतेत भर घातली आहे.काही दिवसांपूर्वीच रस्त्यावर पकडलेल्या मगरीनंतर हा प्रकार पुन्हा समोर आल्याने तलावात अंदाजे तीन ते चार मगरींचा वावर असल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी सायंकाळी पाण्यात झालेल्या जोरदार उड्यांचे आवाज, पाण्याचे उडालेले फवारे आणि पाण्यातील हालचालींनी गावकरी क्षणभर दचकले. या सततच्या हालचालींमुळे तलाव परिसरात मगर धोका पुन्हा गंभीर बनला आहे.

काही दिवसांपूर्वीच गावातील रस्त्यावर एक प्रौढ, वाढलेली मगर दिसून आली होती. गावातील काही तरुणांनी ती पकडून वन विभागाच्या ताब्यात सुपूर्द केली होती. मात्र आजच्या घटनेने स्पष्ट झाले की या तलावात अजूनही मगरींचे अस्तित्व आहे आणि त्या चांगल्याच वाढीस लागल्या आहेत.तलावाच्या आसपास राहणाऱ्या स्थानिकांनी सांगितले की पाण्यातून होणारे उड्या-आवाज आणि सततचे दर्शन पाहता मोठ्या तलावात मगरींचा वावर निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाने याची नोंद घेतली असून ते उद्या (शनिवारी, दि. 29 नोव्हेंबर, 2025 रोजी) प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, नगरसेवक, गावातील मान्यवर, पोलीस पाटील तसेच गावकऱ्यांच्या समन्वयाने पुढील कारवाईची रूपरेषा आखण्याचा विभागाचा मानस आहे. दरम्यान वन विभागालाही काही महत्त्वाचे प्रश्‍न भेडसावत आहेत… या परिसरात मगरी नेमक्या कशा आल्या? त्यांना वाढीस पोषक असे कोणते वातावरण येथे उपलब्ध झाले? त्यांच्या अस्तित्वामागील मूळ स्रोत कोणते?

या सर्व गोष्टींची चौकशी विभागाकडून करण्यात येणार आहे.दरम्यान, गावातील कचरा संकलन वाहन चालक कुनाल गवंड हे नेहमीच मगरी दिसत असल्याचे सांगत असून ते सतत गावकऱ्यांना सावध करत आहेत.त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माणगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर यांनीही या मगरींच्या प्रश्नावर अधिकृत अर्ज सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे या विषयाला राजकीयही महत्त्व प्राप्त झाले आहे.

वन विभाग उद्या स्थळ पाहणी करून वस्तुस्थिती तपासणार असला तरी स्थानिकांनी व्यक्त केलेला 3–4 मगरींच्या उपस्थितीचा अंदाज परिस्थितीची गंभीरता अधोरेखित करतो. नागरिक, स्थानिक संस्था आणि वन विभाग यांच्या समन्वयातून योग्य ती उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज आहे. खांदाड गावातील लोकजीवन सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस पावलं उचलली गेली नाहीत, तर हा प्रश्न पुढील काळात अधिक गंभीर रूप धारण करू शकतो.त्यामुळे खांदाडमधील मगर समस्या आता फक्त चर्चा नसून गावाच्या सुरक्षेचा प्रमुख विषय बनला आहे.