रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत तुफान राडा… लोकशाहीच्या उत्सवात रायगडमध्ये कार्यकर्त्यांची दंगल!…

0
32

महाड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

रायगड जिल्ह्यात महाड नगरपरिषदेची निवडणूक पहिल्यापासूनच चर्चेत होती. आधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद सर्वश्रुत असताना महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आणि त्यांनी शिवसेना विरुद्ध निवडणूक लढवली. त्यामुळे या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना आमदार व मंत्री भरत गोगावले असाच रंग आहे. अशातच आज (2 डिसेंबर) मतदान सुरू असताना महाडमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि त्यांच्यात तुफान राडा झाला. त्यामुळे आता निवडणूक यंत्रणा आणि पोलीस प्रशासन कोणती कारवाई करणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले सुशांत जाबरे यांनी शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. सुशांत जाबरे यांच्यासह त्यांच्या सुरक्षारक्षाकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. विकास गोगावले हे भरत गोगावले यांचे पुत्र आहेत. जाबरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे शिवसेनेला त्यातही गोगावले यांच्यासाठी धक्कादायक होते. त्याचा राग या माध्यमातून काढण्यात आल्याची चर्चा आहे. जाबरे यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर भरत गोगावले यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या सर्व प्रकारावर सुनील तटकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ही गुंडगिरी असून पायाखालची वाळू घसरल्यावर लोक असे वागतात. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेने याची काळजी घेण्याची गरज होती, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली आहे.दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रभाग 2 आणि 3 मध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यांच्या वाद सुरू झाला आणि तो इतका विकोपाला गेला की त्यांच्यात हाणामारी झाली. विकास गोगावले यांनी या संदर्भात गंभीर आरोप केला आहे. जाबरे समर्थकाने रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा आरोप केला आहे तर जाबरे यांना 50 ते 60 जणांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी केला आहे. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष रायगड जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. दोन्ही नेते सतत एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप करत असतात. रायगडमधील शिवसेनेचे भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरात हे तिन्ही आमदार कायम सुनील तटकरे यांना लक्ष्य करतात. तर सुनील तटकरेही नेहमी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत प्रतिटोला हाणत असतात. शिवाय पालकमंत्रीपदाचा तिढा न सुटल्याने तटकरे विरुद्ध गोगावले वाद कायम चिघळत असतो. या संपूर्ण वादातूनच आज महाडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.