रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या प्रचाराला विराम मिळाला असला तरी,या दहा दिवसांच्या रणधुमाळीत जनतेचे मूलभूत प्रश्न हवेतच विरले आणि राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनीच मैदान दणाणून सोडले.आज (मंगळवारी) होणारे मतदान हे विकासाच्या अजेंड्यावर नसून,कोणत्या नेत्याचे राजकीय भांडवल अधिक मजबूत आहे, हे सिद्ध करणारे ठरणार आहे.या निवडणुकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह (एकनाथ शिंदे, अजित पवार) अनेक बडे नेते प्रचारात उतरले.शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीचे घटक पक्ष असूनही एकमेकांविरुद्ध लढल्याने संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय चित्र बिघडले.रोह्यात मुख्यमंत्र्यांनी रॅली काढली,तर अजित पवारांनी कर्जतमध्ये जोर लावला.परंतु,इतक्या मोठ्या नेत्यांनी दिलेल्या वचनांची पूर्ती झाली नाही,तर स्थानिक पातळीवर कोण जबाबदार राहणार? हा कळीचा प्रश्न अनुत्तरित राहिला.अलिबाग,रोहा आणि कर्जतमध्ये दुरंगी लढती आहेत,तर खोपोली आणि महाडमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची गर्दी आहे.उरण आणि श्रीवर्धनमध्ये चार पक्षांची लढत आहे.ही बहु-कोनी लढत स्थानिक समस्या सोडवण्याऐवजी केवळ जागावाटप आणि राजकीय तडजोडीतील अपयश दर्शवते.
राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे तीन असे एकूण सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले, या आकडेवारीवरूनही पडद्याआडच्या राजकीय समीकरणांची झलक मिळते.५७५ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.जनतेच्या मुद्द्यांना बगल देत,फक्त सत्तेच्या केंद्रीकरणासाठी लढल्या गेलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कौल काय असेल,याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

