खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
खारघर रेल्वे स्टेशन परिसर हा रिक्षाचालक आणि अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात पूर्णपणे अडकला असून,यामुळे प्रवाशांचे जीवन अक्षरशः नरकमय झाले आहे.सकाळी आणि विशेषतः संध्याकाळच्या वेळी ही गर्दी इतकी वाढते की,स्टेशनवरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाट काढावी लागत आहे.
सकाळच्या वेळी रिक्षाचालक थेट स्टेशनच्या दारात ठाण मांडून बसतात,ज्यामुळे प्रवाशांना बाहेर पडणेही मुश्कील होते. मात्र, संध्याकाळ होताच ही समस्या महाभयंकर रूप धारण करते. स्टेशनसमोर आणि परिसरामध्ये रिक्षा आणि फेरीवाल्यांची अचानक होणारी बेसुमार गर्दी, यामुळे पादचाऱ्यांसाठी जागाच उरत नाही. परिणामी, प्रवाशांना धक्काबुक्की करत आणि अक्षरशः मिळेल त्या जागेतून वाट काढत जावे लागते.
या समस्येवर कधीतरी नाममात्र कारवाई केली जाते, पण ती केवळ नावापुरती असते . कारवाई झाली की फेरीवाले काही मिनिटांसाठी गायब होतात, पण काही वेळातच पुन्हा आपले बस्तान मांडून परिस्थिती ‘जैसे थे’ करतात.फेरीवाल्यांपेक्षाही रिक्षाचालकांचा त्रास कायमस्वरूपी राहतो.प्रशासनाच्या डोळ्यांदेखत हा गोंधळ सुरू असून,स्वच्छ आणि मोकळ्या स्टेशन परिसराची प्रवाशांची मागणी केवळ मागणीच राहिली आहे.
स्थानक परिसर स्वच्छ, मोकळा आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करा,’ अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून होत आहे. केवळ दिखाव्यासाठी नाही, तर हा रिक्षा आणि फेरीवाला माफियांचा विळखा तोडण्यासाठी आता विशेष आणि कठोर कारवाई करण्याची नितांत गरज आहे, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही!

