खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
नवी मुंबईतील खारघर वसाहत दिवसेंदिवस वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकत असताना, येथील असंख्य रिक्षा थांब्यांवर असलेल्या अनागोंदीमुळे रिक्षा चालक आणि प्रवासी दोघेही त्रस्त झाले आहेत.आरटीओ, वाहतूक पोलीस किंवा महानगरपालिका यापैकी कोणाचीही अधिकृत मंजुरी नसताना हे थांबे ‘जैसे थे’ सुरू आहेत,ज्यामुळे सेवेत मोठा अडथळा येत आहे.खारघरमध्ये अनेक ठिकाणी रिक्षा थांबे दिसत असले तरी,यातील एकाही थांब्याला प्रशासकीय मान्यता नाही. अधिकृत थांबे नसल्याने रिक्षाचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.स्थानिक भूमीपुत्र रिक्षा चालकांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
त्यांच्या मते,जर प्रशासनाने अधिकृत थांबे देऊन तिथे निवारा शेड उभारले, तर अनेक समस्या दूर होतील… अनधिकृत थांब्यांमुळे रिक्षा चालक-मालक यांची गैरसोय तर होतेच, पण सर्वात जास्त त्रास होतो तो सर्वसामान्य प्रवाशांना. सेवेतील अनियमितता, गैरसोयीचे थांबे आणि तक्रारीसाठी व्यासपीठाचा अभाव यामुळे प्रवाशांना मनमानी रिक्षा भाड्याचा आणि त्रासाचा सामना करावा लागतो.प्रश्न हा आहे की, खारघरच्या या महत्त्वपूर्ण समस्येकडे आरटीओ, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका कधी गांभीर्याने पाहणार आणि रिक्षाचालकांना अधिकृत थांबे व निवारा शेड उपलब्ध करून प्रवाशांना चांगली व सुरक्षित सुविधा मिळवून देणार?

