भ्रष्टाचाराचा बॉम्ब…उरण नागाव ग्रामपंचायतीत लाखोंचा गैरव्यवहार… आदर्श ग्रामसेवकाचे बिंग फुटले…विकासकामांच्या नावाखाली लुटारू कारभार…

0
13

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):- 

उरण तालुक्यातील ग्रामपंचायती भ्रष्टाचाराचे अड्डे बनले असताना,सर्वांत मोठी आणि महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या नागाव ग्रामपंचायतीतील महाघोटाळ्याने संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले आहे… अनेक महिन्यांपासून ग्रामस्थ पुरावे देत होते,पण उरण पंचायत समिती मुद्दाम चौकशी टाळत होती.मात्र, जेव्हा थेट जिल्हा परिषदेत (ZP) तक्रार पोहोचली, तेव्हा ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार विजेते ग्रामसेवक किरण केणी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. नागावमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार,खोटे दाखले,फाईलींची अदलाबदल आणि निधीचा अनियमित वापर झाल्याच्या गंभीर तक्रारी ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे दाखल केल्या होत्या.पण,या तक्रारींवर कार्यवाही करण्याऐवजी ‘निकाली काढले’ असा शिक्का मारण्याचा धक्कादायक प्रकार उरण पंचायत समितीमध्ये सुरू होता.यामुळे पंचायत समितीचे अधिकारीच भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी ‘ढाल’ बनले होते का?असा सरळ प्रश्न आता तालुक्यात विचारला जात आहे. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, ज्या किरण केणी यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून निलंबन झाले, त्यांना काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेने ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्काराने सन्मानित केले होते! ग्रामस्थांच्या गंभीर तक्रारी प्रलंबित असताना हा पुरस्कार देण्यात आलाच कसा? आदर्श पुरस्कारांसाठीही भ्रष्टाचार झाला का?अशी दबकी चर्चा आता रायगडपर्यंत पसरली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारभारावरही यामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागावच्या घोटाळ्याने सिद्ध केले आहे की, भ्रष्टाचार करणारे आणि त्यांना संरक्षण देणारे यांची साखळी प्रशासकीय व्यवस्थेत किती खोलवर रुजली आहे!