नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
देशातील सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील हार्बर आणि ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांनी प्रवाशांच्या सोयीऐवजी गैरसोयीचा आणि आरोग्याच्या धोक्याचा नवा अध्याय लिहिला आहे.वाशी ते पनवेल आणि नेरुळ-उरण मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवरील स्वच्छतागृहांची अवस्था इतकी दयनीय आहे की,स्मार्ट सिटीच्या तोंडात घाण असाच अनुभव प्रवाशांना येत आहे.देखभालीचा पूर्णपणे अभाव आणि सिडको प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही स्वच्छतागृहे आता वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत, ज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
सानपाडा, तुर्भे, ऐरोली, कोपरखैरणे, जुईनगरपासून ते नेरुळ, सीवूड्स, खारघर, पनवेल आणि अगदी नवी मुंबईची ओळख असणाऱ्या वाशी स्थानकांपर्यंत सर्वत्र स्थिती गंभीर आहे. सिडकोने कंत्राटी पद्धतीने देखभालीची व्यवस्था करूनही, प्रत्यक्षात मात्र ‘कंत्राटदाराला मोकळं रान’ मिळाल्याचं चित्र आहे.अनेक स्वच्छतागृहांमध्ये पाणीपुरवठाच नसल्याने स्वच्छतेची कल्पना करणेही अशक्य झाले आहे.तुटलेले दरवाजे-नळ, गंजलेल्या पाइपलाइन, फोडलेली स्वच्छता उपकरणे, अस्वच्छ फरशी आणि सिंक, आणि बंद दिवे यामुळे आतील भागात कायम अंधार व दुर्गंधीचे साम्राज्य असते. बामणडोंगरी आणि खारकोपरसारख्या नव्या स्थानकांवरील स्वच्छतागृहे वारंवार बंद ठेवली जातात, तर तुर्भे व सानपाडा येथे कर्मचारीच उपलब्ध नसल्याने स्वच्छता कधीतरीच होते.या दयनीय अवस्थेचा सर्वाधिक फटका महिला प्रवाशांना,ज्येष्ठ नागरिकांना आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना बसत आहे.वर्दळीच्या स्थानकांवरही स्वच्छतागृहे पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते.सिडकोने ‘स्वच्छता आणि देखभालीसाठी’ कंत्राटदाराला पैसे दिले तरी, ते कशासाठी? हे पैसे फक्त कागदोपत्री खर्च दाखवण्यासाठी आहेत का?अत्याधुनिक मानल्या गेलेल्या नेरुळ-उरण मार्गावरील नव्या स्थानकांमध्येही परिस्थिती फारशी वेगळी नाही. काही युनिट्स सुरू असली तरी, पाणी आणि स्वच्छतेचा अभाव तिथेही ठळकपणे जाणवतो. प्रवाशांना वापरासाठी जागा न मिळाल्याने त्यांना इतरत्र व्यवस्था शोधावी लागत आहे,ज्यामुळे परिसरात आणखी अस्वच्छता पसरून आरोग्यविषयक धोके वाढले आहेत.प्रवाशांनी या गैरसोयीबद्दल वारंवार तक्रारी करूनही सिडको प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय राहिले आहे. नियमानुसार नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा आणि प्रकाशयोजनेची तपासणी अपेक्षित असताना, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.सिडको प्रशासनाने त्वरित डोळे उघडून या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करावी,अन्यथा ‘स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबई’ची ही लज्जास्पद ओळख लवकरच ‘दुर्गंधीयुक्त शहर’ अशी होईल.

