मुंबई-गोवा महामार्गावर ‘तिरडी यात्रा’!… अपूर्ण रस्त्यांविरोधात जनतेचा रौद्रावतार…

0
2

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):- 

मुंबई-गोवा महामार्गाचे वर्षानुवर्षे रखडलेले काम, निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि प्रशासनाचे थंड धोरण या विरोधात स्थानिक नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उसळला आहे! वाढत्या अपघातांना आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाला वाचा फोडण्यासाठी जनआक्रोश समितीने शनिवारी (दि.6) माणगाव येथील लोणेरे पुलावरून ‘तिरडी यात्रा’ काढून शासन, प्रशासन आणि ठेकेदारांना कठोर संदेश दिला. स्थानिकांच्या या अभूतपूर्व आणि आक्रमक आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

माणगावातील पहेल-खांडपाले बायपासचे काम अपूर्णावस्थेत असल्याने या ठिकाणी भीषण अपघाताची टांगती तलवार आहे. चारही दिशेने वाहतूक सुरू होणे अपेक्षित असताना, केवळ एकाच बाजूचा रस्ता सुरू आहे आणि उर्वरित तीन बाजूंचे काम अद्यापही रेंगाळले आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, मोटारसायकलस्वार आणि रिक्षाचालक अक्षरशः जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडत आहेत. या मार्गाला ‘दररोजचा मृत्यूमार्ग’ असे वर्णन करत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे.”

​जनआक्रोश समितीच्या नेतृत्वाखाली निघालेली ही ‘तिरडी यात्रा’ म्हणजे स्थानिकांच्या वेदनांची आणि क्रोधाची निशाणी होती. पहेल आणि खांडपाले येथील अनेक नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या आक्रमक आंदोलनात सहभागी झालेल्या संतप्त नागरिकांनी एकमुखाने प्रशासनाला आव्हान दिले आहे. बायपासचे काम तातडीने आणि युद्धपातळीवर सुरू करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे. अपूर्ण कामे, निकृष्ट रस्ते आणि महामार्गावर होणारे मृत्यू आता सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराच या जनआक्रोश समितीच्या आंदोलनाद्वारे देण्यात आला आहे.