माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
तळाशेत जिल्हा परिषद गट क्रमांक ४६ ची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची ठाम घोषणा माणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास सुर्वे यांनी केली. हा निर्णय पक्षाच्या वाढत्या आत्मविश्वासाचा आणि माणगाव तालुक्यात काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याच्या निर्धाराचा स्पष्ट संदेश देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या काळात तळाशेत परिसर हा काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला राहिला असून शिक्षण, शेती व ग्रामीण विकासाची भक्कम पायाभरणी याच काळात झाली, असे त्यांनी नमूद केले. पूर्वीच्या एका आघाडीतील विश्वासघातामुळे पक्षाला अडचणी आल्या; मात्र आता परिस्थिती बदलली असून काँग्रेस नव्या जोमाने मैदानात उतरली आहे, असे सुर्वे म्हणाले.
स्वबळावर लढत असतानाही महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा पूर्ण पाठिंबा काँग्रेसला मिळत असून माणगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती — दोन्ही स्तरांवर विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकास, स्वच्छ प्रशासन, भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलता आणि कार्यकर्त्यांची ताकद हाच काँग्रेसचा खरा अजेंडा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
अखिल भारतीय काँग्रेसचे नेतृत्व, कोकण निरीक्षक यू. बी. व्यंकटेश, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा नेतृत्वाचा भक्कम पाठिंबा लाभत असल्याचे सांगत, तळाशेत झेडपी गट क्रमांक 46 साठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. भारती विलास सुर्वे यांना ‘हात’ या चिन्हावर मतदान करून मोठ्या फरकाने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. “काँग्रेसला मत द्या, प्रगतीला मत द्या,” अशी जोरदार घोषणा त्यांनी दिली.

