शिवसत्ता टाइम्स मुंबई (वार्ताहर) :-
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहे. एवढेच काय तर, आयाराम गयारामांची ये-जा देखील सुरू आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर यंदाची पहिलीच विधानसभा असल्यामुळे सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यात काही शंकाच नाही. अद्याप निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही, तरीदेखील संपूर्ण साम, दाम, दंड भेद वापरुन विरोधकांना मात देण्यासाठी सर्वांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यात आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अजित पवारांना ठाकरेंनी जोर का झटका दिल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अजित पवारांच्या संपर्कात असलेले पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे… महायुतीला पाठींबा देत, सत्तेत सामील झालेल्या अजित पवार यांनी आगामी विधानसभेसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. अशातच आपली ताकद वाढवण्यासाठी अजित दादा गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नात होते. पण, ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे…पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडून उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे…. मोठे शक्तिप्रदर्शन करत रवी लांडगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते…मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधण्यात आले… त्यांच्यासोबत शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्यासह इतर पदाधिकारी आहेत… भाजपने वेळोवेळी डावलल्याने शिवसेना ठाकरे गटात जात असल्याचे मत व्यक्त केले आहे. विद्यमान आमदार महेश लांडगे यांना कंटाळून मी हा निर्णय घेत असल्याचे रवी लांडगे यांनी अधोरेखित केले. आगामी काळात भोसरी विधानसभेत लढण्यास मी इच्छुक आहे…पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवेल अशी भूमिका देखील रवी लांडगे यांनी व्यक्त केली आहे…