लाडकी बहीण नको…तर बहीण सुरक्षित योजना हवी…  तुमच्या दिड हजारांनी आमचे काहीही होणार नाही, न्याय द्या… 

0
93

शिवसत्ता टाइम्स बदलापूर (वार्ताहर) : –
बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या तसेच सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे…बदलापूरमधील एका शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे दुष्कृत्य केले आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे…बदलापूरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले आहेत…ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेला आदोलकांनी घेराव घातला आहे… तर बदलापूर रेल्वे स्थानकावरही शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या आहेत. याच आंदोलनातील एका महिलेने सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत. आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे. तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको आहेत. आमच्या मुलीच सुरक्षित नसतील तर आम्ही काय करावे? असा संतप्त सवाल या महिलेने राज्य सरकारला केलाय. लाडक्या बहि‍णींच्या मुलीला न्याय द्यायला तुम्ही कुठे आहात?आम्हाला दहीहंडी नको आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमाला आम्हाला कोणी सेलिब्रिटी नको आहे. पण आम्हाला न्याय हवा आहे. अशा प्रसंगात तुम्ही राजकारणी लोक इथे येऊ शकत नसतील तर तुमचा काय फायदा. तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणता मग लाडक्या बहि‍णींच्या मुलीला न्याय द्यायला तुम्ही कुठे आहात? असा परखड सवाल आंदोलक महिलेने केला. तुमच्या दीड हजार रुपयांनी काहीही होणार नाही…आम्ही प्रशासनाच्या विश्वासावर आमची मुले सोडतो आणि कामाला जातो. आमची मुले सुरक्षित नसतील तर आम्ही काम तरी कशासाठी करावे. आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना नको आहे, अशी संतप्त भावना एका आंदोलक महिलेने व्यक्त केली…आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा. अशाच घटना घडत राहिल्या तर आमच्या मुलींना आम्हाला घराच्या बाहेर काढताना विचार करावा लागेल. माझी मुलगी सुरक्षित आहे का? आम्ही रोज मुलांना गुड टच, बॅड टच शिकवतो. पण समोरच्या नराधमाला गुड टच, बॅड टच काय असतो हे समजत नसेल तर काय फायदा? असा सवाल या संतप्त महिलेने राज्य सरकारला विचारला… लाडकी बहीण फक्त पोस्टरवर सुरक्षित ठेवणारे खोके सरकार प्रत्यक्षात लाडक्या बहिणींची आणि त्यांच्या लेकीची सुरक्षा करण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे…हे सरकार भगिनींना पैसे तर देत आहे…. परंतु त्यांच्या सुरक्षेचे काय ?ती कधी देणार ? असे सवाल आता आम जनता करीत आहे…