माणगाव शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी , दिपक दपके):-
नवी मुंबईतील नेरुळमधील इस्टेट एजंट सुमित जैन आणि अमीर खानजादा हरवल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वी दाखल केली होती. त्यानंतर शुक्रवार दि.२३ ऑगस्ट रोजी सुमित जैन याचा मृतदेह पेण-खोपोली महामार्गावरील गागोदे बुद्रुक गावाजवळ आढळल्याने खळबळ उडाली आहे…गुरुवार दि. २२ ऑगस्ट रोजी त्यांची गाडी एक्स्प्रेसवेवरील पाली फाट्याजवळ आढळली होती. तेव्हा गाडीत बंदुकीच्या दोन गोळ्या आणि रक्ताचे डाग आढळले होते. शिवाय कारवर गोळीबार झाल्याचे दिसून आले होते. शिवाय दोघेही गायब होते. एकूणच हे प्रकरण गंभीर असून असून आता नवी मुंबई पोलिसांसह रायगड पोलीसही तपासाला लागले आहेत…पेण-खोपोली महामार्गावरील गागोदे बुद्रुक गावाजवळील झाडाझुडपात एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पेणचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी फडतरे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि नवी मुंबई क्राईम ब्रांच, खालापूरचे डीवायएसपी विक्रम कदम, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत घटनास्थळी दाखल झाले…हे क्षेत्र पेण पोलिसांच्या हद्दीत आहे…दोन मित्र आणि इस्टेट एजंट असलेले खोपोलीला येतात आणि गायब होतात, याचे गूढ आणखी वाढले आहे. गंभीर बाब म्हणजे त्यांची गाडी खोपोलीत असल्याचे गाडीच्या जीपीएसवरून समजले होते. तर आता एकाचा मृतदेह पेणजवळ गागोदेजवळ आढळला आहे. तर दुसरा मित्र अमीर खानजादा अजून गायब आहे…त्यामुळे या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे…कारला जीपीएसची सुविधा असल्याने ही कार मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या पाली फाटा एक्झिटच्या बाजूला कॅफे सागर हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आढळली…