Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडयंदाही गणपती बाप्पाचे आगमन खड्डयांतूनच होणार... मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य...

यंदाही गणपती बाप्पाचे आगमन खड्डयांतूनच होणार… मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य…

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर): 

बाप्पांचे आगमन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यानुसार गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. परंतु, रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरूड, अलिबाग-पेण मार्गासह मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. दर्जेदार पायाभूत सुविधांचा गवगवा करणाऱ्या संबंधित प्रशासनाने रस्त्यांच्या दुरवस्थेकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. परिणामी, जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची वाताहत झाली आहे. त्यामुळे यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यांतूनच होणार असल्याने नागरिक हैराण झाले आहेत…मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. शासनाकडून अनेकवेळा आश्वासने दिली जात आहेत. परंतु, प्रत्यक्षात ठोस अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. मुंबई-गोवा मार्गावरून हजारो वाहनांची वर्दळ असते. परंतु, खड्डेमय रस्त्यामुळे या मार्गावरील प्रवास नकोसा होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षपणामुळे प्रवाशांना तसेच वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे… अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. या मार्गावरील प्रवास सुखकर होण्याची अपेक्षा या मार्गावरील प्रवाशांना होती. परंतु, आजही परिस्थिती बिकट आहे. अलिबाग-रोहा मार्गासह वावे-बेलोशी, अलिबाग-पेण, अलिबाग-मुरूड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या वाड्या, वस्त्यांकडे जाणारे रस्तेदेखील खड्डेमय झाले आहेत…दरवर्षी या रस्त्यांचे खड्डे बुजविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, परिस्थितीत काहीच बदल दिसून येत नाही…यावर्षी बाप्पाचे आगमन चांगल्या रस्त्यातून होण्याची अपेक्षा रायगडकरांना होती. परंतु, ही अपेक्षा फोल ठरली आहे. यंदाही बाप्पाचे आगमन खड्यातून होणार आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांतूनच बाप्पाला घरोघरी जावे लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments