खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
खोपोली नगर परिषदेच्या सावित्रीबाई फुले भाजी मार्केटची इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. या मार्केटमध्ये भाजी, चिकन, मटणसह अनेक विक्रेत्यांची दुकाने असून ते आपआपला व्यवसाय करताना दिसून येत आहेत. मार्केटच्या इमारतीच्या स्लॅबच्या काँक्रीटचे तुकडे अनेक ठिकाणी कोसळले असून त्यातील लोखंडी सळ्या गंजून तुटून खाली पडत आहेत. तसेच दादऱ्याखाली तळीरामांच्या दारुच्या बाटल्यांचा खच पडला असून घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. या मार्केटच्या टेरेसवर तसेच दादऱ्यावर दररोज तळीराम व जुगारड्यांच्या खेळाची मोठी बैठक सुरु असते. या दादऱ्याखालीच लघवी व दारूच्या रिकाम्या बाटल्या व प्लास्टिकच्या पिशव्यासह कचरा टाकण्यात येत असतो. मात्र, नगर परिषद प्रशासन उघड्या डोळ्याने बघत असून कोणतीच कार्रवाई करीत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
खोपोली नगर परिषदेने गेल्या एक वर्षापासून सदरची इमारत धोकादायक असल्याचे फलक लावले असल्याची माहिती आम आदमी पार्टी प्रदेश संगठन सचिव डॉं. रियाज पठाण यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. सदरची इमारत धोकादायक असून वापरण्यास योग्य नाही. तरी कोणीही सदर इमारतीचा कुठल्याही प्रकारचा वापर करु नये. सदर इमारतीचा आसरा घेवू नये व सदर इमारतीमुळे आपघात झाल्यास त्यास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार नाही, अशा जाहीर आवाहनाचे सूचना फलक नगर परिषदेने मार्केट समोर लावले आहे. मात्र, सूचना फलक लावले असतांना या इमारतीखाली अनेक दुकानदार आप-आपली दुकाने मांडून व्यवसाय करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नगर परिषदेचे हे सूचना फलक फक्त स्टंटबाजी करण्यासाठी लावले आहे की नागरिकांना जनजागृती करण्यासाठी ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या मार्केटमध्ये अंदाजे शंभरहून अधिक गाळे आहेत. यात अनेक गाळे बंद असून काही लोक व्यवसाय करतांना दिसत आहेत. काही दिवसाआधी एका भाजी विकणाऱ्या व्यवसायिकाच्या दुकानात स्लॅबचा काँक्रीट कोसळला असल्याचे दुकानदाराने सांगितले. ही इमारत अंदाजे पन्नास ते साठ वर्ष जुनी आहे. मात्र, या व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी नगर परिषदेने कोणती उपाययोजना केली नसल्याने हे व्यवसाय करीत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. शिळफाटा परिसरात हा एकमेव मार्केट असल्यामुळे दररोज शिळफाट्यासह इतर गावातून शेकडो नागरिक भाजी, मटन, मच्छीसह इतर वस्तूंची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. मार्केटमध्ये जागोजागी अस्वच्छता असून प्रचंड दुर्गंधी वास असल्याने नागरिकांना नाकाला रुमाल व डोक्याला कफन बांधून खरेदी करावी लागत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नवीन गाड्या, नवीन ठेकेदार, कोट्यवधीचा ठेका देवून मार्केट परिसरात अस्वच्छता नागरिकांना मोठी रोगराई होण्यासाठी ठेवण्यात आली आहे का ? लोकसेवक व ठेकेदारांने डॉक्टरांचा धंदा वाढविण्याचाही टेंडर घेतला आहे का? इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाल्यास याला नक्कीच जबाबदार कोण असणार ? खरेदीसाठी येणारे नागरिक व्यवसाय करणारे व्यावसायिक की प्रशासन? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. या मार्केटची इमारत कोसळून जिवीतहानी होण्यापूर्वी खोपोली नगर परिषदेने ताबडतोब इमारतीचे नुतणीकरण करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संगठन सचिव डॉं. रियाज पठाण यांनी केली आहे.