खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):
खोपोली नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठा पगार, बोनस, पेन्शन, मेडिकल, पीएफ पाहिजे… पण काम नको… कारण दुपारी तासंतास न.प.कार्यालय रिकामे असते… दुपारी अधिकारी-कर्मचारी जे जेवायला जातात… ते उशिरापर्यंत येत नाहीत… अशी लोकांची ओरड आहे… तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी व उपमुख्याधिकारी कार्यलयात कधीही गेल्यास उपस्थित नसल्याचे सांगण्यात येते… त्यामुळे खोपोली नगर परिषदेवर नियंत्रण कोणाचे? असा सवाल होत आहे… या प्रकरणी आता जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे… मुख्याधिकारी व उपमुख्याधिकारी कार्यलयात हजर नसतात त्यामुळे ते नेमके कोठे जातात? यासाठी वरिष्ठांनी त्यांचे हालचाल रजिस्टर तपासावे… नियमानुसार शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना आपल्या कर्तव्यावर असताना शासकीय कार्यालयाच्या बाहेर जायचे असेल तर हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते… जाण्याची वेळ, काम आणि येण्याची वेळ नमूद करावी लागते… खोपोली न.प. कार्यालयात हालचाल रजिस्टर नावाची वस्तू आहे काय? असा सुज्ञ नागरिकांचा सवाल आहे…
खोपोली न.प.कार्यालयात लोकसेवक असणाऱ्या अधिकाऱ्यांना साहेब म्हणावे लागते… साहेब कोठे आहेत? असे लोकांनी विचारल्यावर… जेवायला गेले आहेत… कधी येतील? माहीत नाही… असे उत्तर मिळते…. कधी-कधी साहेबांचे ऑडिट चालू आहे… असेही उत्तर मिळते… आता साहेबांचे पर्सनल ऑडिट कसले? हा संशोधनाचा विषय आहे… नागरिकांनी आपली नोकरी, व्यवसाय, महत्वाची कामे सोडून लोकसेवेसाठी असलेल्या कार्यालयात लोकसेवकांकडे यायचे… तर येथील लोकसेवकांचा तोरा निराळाच पहायला मिळतो… फेऱ्या मारूनही लोकांची कामे होत नाहीत… लोक उपाशीपोटी न.प.कार्यालयात या लोकसेवक अधिकाऱ्यांची वाट पहात असतात… मात्र यातील काही लोकसेवक अधिकारी-कर्मचारी दुपारी जेवायला जी कल्टी मारतात… त्यानंतर ते लवकर कार्यालयात येत नाहीत… उशिरा चार-पाच वाजता थेट दातात काडी घालत येतात… आल्यावर समोरच्या मायबाप जनतेकडे तुसडेपणाने पहात… उद्या या… आज इंटरनेट प्रॉब्लेम असून साईट बंद आहे… आम्हाला दुसरी कामे आहेत… मशीन नसल्यामुळे काम करता येत नाही… अशी पठडीतली उत्तरे दिली जातात… वस्तुतः कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच डबे आणून वेळेत जेवायचे असते… मात्र खोपोली न.प.चे अधिकारी-कर्मचारी घरी जेवायला का जातात? याचे उत्तर खोपोलीकरांना अपेक्षित आहे…
खोपोली शहराच्या स्वछतेसाठी नगर परिषदेने घण्टा गाड्या घेतल्या… नवीन ठेकेदाराला शहरातील स्वच्छतेचा ठेका दिला… मोठा गाजावाजा करत उद्घाटन केले… तरी खोपोली शहरात जागोजागी घाणीचे ढिगारे रस्त्यावर आहेत… शहरात अस्वच्छता कायम आहे… मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानची तुटलेली संरक्षण भिंत अद्याप दुरुस्त झालेली नाही… वाढलेले गवत काढलेले नाही… आम आदमी पार्टीने लेखी निवेदन देऊनही लोकसेवक मुख्याधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे… पत्रकारांनी माहितीसाठी फोन केल्यावर मुख्याधिकारी यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही… मुख्याधिकारी सरकारी नोकर… लोकसेवक… तर पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ… तरीही बेफिकिरी… खोपोली शहरात डोंगरभर समस्या असताना हे अधिकारी नक्की कोणत्या व कोणाच्या कामात व्यस्त आहेत? असा जनतेचा सवाल आहे… खोपोली नगर परिषदेच्या सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कारभाराची चौकशी व्हावी अशी पत्रकारांसह जनतेची मागणी आहे…