पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-
सिडकोच्या भूखंडावर केलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोकडून धडक कारवाई सुरू आहे. मंगळवारी सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने तळवली येथे कारवाई करत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले… सिडकोने संपादित केलेल्या भूखंडावर भूमाफियांकडून अनधिकृत बांधकामे उभी करण्यात येत आहेत. त्यावर कारवाई करण्यासाठी सिडकोच्या दक्षता विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील पथकाने मोहीम हाती घेतली आहे.
पनवेल ग्रामीण फौजफाटा घेऊन सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी कळंबोली येथे दाखल झाले…कारवाईची कुणकुण लागल्याने कारवाईला विरोध दर्शवण्यासाठी कळंबोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते… यावेळी ग्रामस्थांच्यावतीने माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत,काँग्रेस नेते सुदाम पाटील,शेकाप महिला आघाडीच्या सरस्वती काथारा यांनी पुढाकार घेत कारवाईसाठी आलेल्या सिडको अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली…चर्चेतून कोणतीही सकारात्मक बाब समोर न आल्याने तसेच सिडको अधिकारी कारवाईवर ठाम असल्याने अधिकाऱ्यांसोबत झालेली चर्चा फिस्कटली असून सिडकोच्या कारवाईला विरोध म्हणून मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला भर उन्हात रस्त्यावर ठाण मांडून बसल्या होत्या… यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांनी सिडकोच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला असून गरजेपोटी घरांच्या प्रश्नांवर सिडको प्रशासनाने एकदाचा काय तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे…कारवाईसाठी आलेल्या सिडको अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणल्याने यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते…