रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
समस्त जगात स्वराज्यभूमी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक रायगडच्या रोहा येथील कुंडलिका नदीवरील उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी परीसरातील छ. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा न भूतो न भविष्यतो असा नेत्रदीपक लोकार्पण सोहळा अत्यंत जल्लोषात पार पडला. यावेळी छ. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा 25 फुटी उंचीचा पुतळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त रोह्यात दाखल झाले होते. शिवसृष्टी परीसरात आकर्षक सजावट आणि गडकिल्ल्यांचे स्वरूप या परिसराला प्राप्त झाले होते. छ. शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सर्वांनाच प्रेरणा देत राहील असे उद्गार युवराज छ.संभाजी राजे भोसले यांनी यावेळी काढले. यावेळी शिवकालीन सरदार घराण्याचे वंशज विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते..विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शिवपुतळ्याचे शानदार अनावरण करण्यात आले…मेहेंदळे हायस्कूल ते नदी संवर्धन अशी भव्य मिरवणूकम देखील काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये ढोल ताशा व शिवकालीन सादरीकरण करण्यात आले…
एकूणच डोळ्यांचे पारणे फेडणारा हा ऐतिहासिक सोहळा कायम स्मरणात राहील असेच समाधान शिवप्रेमींच्या चेहऱ्यावर झळकत होते. या कार्यक्रमास खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे तसेच अष्टप्रधान मंडळातील प्रमुख सरदारांचे वारसदार, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.