नवी दिल्ली शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे…सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही…यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा होणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत… महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे…ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचे वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे.महाराष्ट्रात महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे एका बाजूला असतील. दुसरीकडे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे असतील…