शिवसत्ता टाइम्स रायगड (अमुलकुमार जैन) :-
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे…जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमवेत आयोजित बैठकीत श्री. जावळे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. जावळे म्हणाले, निवडणुकीच्या कालावधीमध्ये विविध राजकीय पक्षांकडून सभा तसेच बैठकांचे आयोजन करण्यात येते. या सर्व सभा व बैठकांची माहिती प्रशासनास देऊन त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करुन घ्याव्यात. मतदारांना कुठल्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. विविध जाती, धर्म, भाषिक संप्रदायांमध्ये तेढ निर्माण होईल, असे कुठलेही वक्तव्य करू नये. कुठल्याही धार्मिक स्थळाचा प्रचारासाठी वापर करू नये. समाजमाध्यमांवर पोस्ट करतेवेळी आवश्यक ती काळजी घ्यावी असेही श्री जावळे यांनी स्पष्ट केले.
निवडणूक प्रचार काळात सर्व राजकीय जाहिरातीचे प्रामाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. जिल्हा माहिती कार्यालय येथे माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. सर्वांनी विहित वेळेत परवानग्या घ्याव्यात असे ही श्री जावळे यांनी सांगितले.
निवडणूकीच्या काळात काय करावे व काय करु नये याबाबतची माहिती सर्व राजकीय पक्षांना उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहे. त्या संदर्भात अधिसूचना व आदेश जारी करण्याची प्रक्रिया सुरु आहे.या निवडणूकीत पोलिसांची सोशल मीडियावर देखील करडी नजर असणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन श्री घार्गे यांनी यावेळी केले.