पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी) :-
विधानसभा निवडणुकीसाठी शेकापने उच्चशिक्षित उमेदवार उभे केले आहेत. विरोधक पेणमध्ये शेकाप संपलेला पक्ष असे म्हणत होते पण अतुल म्हात्रेंच्या रूपाने शेकापक्ष भरारी घेत आहे. मी आणि अतुल म्हात्रे व्यावसायिक असून समाजकरणासाठी राजकारण करत आहोत. मात्र पेणमधील विरोधकांचा व्यवसाय हा दलाली असल्याचा आरोप शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी वाशी येथे केला. शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आई जगदंबा मंदिर वाशी येथे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, उमेदवार अतुल म्हात्रे, महादेव दिवेकर, महेंद्र ठाकूर, ऍड.रोशन पाटील, निलेश म्हात्रे, मोहिनी गोरे, प्रल्हाद पाटील, पर्णल कणेकर आदींसह शेकाप व महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले की, पेण मतदार संघात शेकापने पहिल्यांदा आगरी उमेदवार दिला आहार. याअगोदर कधी दिला नव्हता. यापुढे गरिबांच्या जमिनी विकणाऱ्यांना आता ठेचायचे आहे. स्वार्थासाठी पक्ष बदलायचे आणि जनतेकडे मत मागायला जायचे. यांना जनता उभे करणार नाही. अतुल म्हात्रेंसाठी पेण मध्ये जाहीर सभा घेणार आहे, त्यावेळी अजून अधिक स्फोटक बोलेन.मी आणि अतुल म्हात्रे व्यावसायिक आहोत, तर पेण मधील विरोधकांचा व्यवसाय हा दलाली आहे. यापुढे जमिनी विकू नका पेण मतदार संघातील शेतकऱ्यांची जमीन आपल्यालाच विकसित करून शेतकऱ्याला करोडपती बनवायचे आहे. आत्ताची लढाई अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. खारेपाटातील विकासासाठी शिट्टी वाजवून दलालांना हद्दपार करायचे आहे असे रोकठोक मत भाई जयंत पाटील यांनी बोलून दाखवले. तसेच अतुल म्हात्रे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. तरी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत थोड्याच दिवसात तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे असेही त्यांनी सांगितले…पेण विधानसभा मतदारसंघ आता विकासकामाने कायापालट करण्यासाठी आपल्याकडे विकासाचे व्हिजन आहे…आपल्याला जनतेला एकत्र घेऊन उद्योजक निर्माण करायचे आहेत…यासाठी 20 तारखेला शिट्टी समोरील बटन दाबून बदल घडवायचा आहे असे आवाहन शेकाप महाविकास आघाडी उमेदवार अतुल म्हात्रे यांनी केले…