उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रागावर नियंत्रण नसल्यास माणूस काय करेल? हे सांगता येत नाही… नुकतेच बेलापूरमध्ये एका 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. बाळावर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला होता. त्याआधी नालासोपारा येथे खिळा ठोकल्याच्या वादावरुन शेजारी राहणाऱ्या महिलेला खाली पाडून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणीच्या अंगावरील कपडे फाडण्याची घटना घडली आहे. यानंतर आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे…
नळाचे पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून आठ मारेकऱ्यांनी एका १८ वर्षीय तरुणीवर हल्ला केला. आरोपींनी या तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून तिच्या अंगावरील कपडे फाडले. हे आरोपी फक्त मारहाणीवर थांबले नाही तर त्यांनी तिच्या डोक्यात पाण्याचा डूम मारला. हा प्रकार नाव्हा गावातील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या पाटील आळीत घडला आहे. याप्रकरणी उलवे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणीला मारहाण करणाऱ्या आठही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.नाव्हा गावात राहणाऱ्या या १८ वर्षीय तरुणीचे वडील ओएनजीसीमध्ये काम करतात. घराजवळ असलेल्या नळाच्या पाण्यावरून तिच्या आईबरोबर शेजारी राहणाऱ्या कुटुंबाशी वाद सुरू होता… या वादाचे कारण विचारण्यासाठी ही पीडित तरुणी त्या ठिकाणी गेली असता सत्यवान पाटील, सायली पाटील, मेघा पाटील, स्वराज पाटील, सचिन पाटील, संगीता पाटील, सुजाण पाटील, सारा पाटील यांनी तिच्यावर हल्ला केला. आरोपींनी या तरुणीच्या अंगावरील सर्व कपडे फाडले. तिला खाली जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. जवळच रिकामे असलेले पाण्याचे ड्रमही तिच्या डोक्यात घातले. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर ही तरुणी मदतीसाठी टाहो फोडत असताना आरोपी थांबले नाहीत. तिला वाचवण्यासाठीही कोणीच पुढे आले नाही. या तरुणीला आरोपींनी जातीवाचक शिवीगाळही केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात अॅट्रोसिटी अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आठही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रांजणे यांनी दिली… हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आरोपींनी अमानुषपणे या तरुणीला मारहाण केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहिल्यानंतर नागरिकांनी आरोपींच्या विरोधात संताप व्यक्त करून व्ही पीडित तरुणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे…