रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनी च्या संलग्न बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात बेणसे सिद्धार्थ नगर व विभागातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. पाईपलाईन बाधित शेतकऱ्यानी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी निवेदनानुसार आपली शेतजमीन वाचविण्यासाठी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांनी दंड थोपटले आहेत.रिलायन्स नागोठणे कंपनीच्या विरोधात शेतकरी योगेश अडसुळे यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलेय. या लढ्याला शेतकरी, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त , ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. रिलायन्स ने प्रकल्प उभारत असताना येथील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी आजवर दिली गेलेली नाही. अशातच येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेतजमिनी कडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. उपोषणकर्ते योगेश अडसुळे यांनी रायगड जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे स्पष्ट म्हटले आहे की आमची वडिलोपार्जित मिळकत क्रमांक 9/2 अ क्षेत्र 0- 39 – 06 ही जमीन तत्कालीन इंडियन पेट्रोकेमिकल्स या सरकारी कारखान्या करिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महा मंडळामार्फत खरेदी करणेकामी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता तसेच आम्हाला सदर जमिनीचा कोणताही मोबदला न देता परस्पर सदर जमीन महाराष्ट्र् औद्योगिक विकास महामंडळाच्या नावाने करून फसवणूक केली असल्याची तक्रार अड सुळे यांनी केली आहे. आता रिलायन्स नागोठणे कंपनी कडून शेत जमिनीत पेट्रोलियम कायदा 1962 चे उल्लंघन करून पाईपलाईन टाकणेकामी उल्लंघन केले आहे. त्यामुळे सदरचे काम थांबवून मला न्याय मिळावा यासाठी बेणसे सिद्धार्थ नगर येथे आमरण उपोषण सुरु केले असून जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही असा इशारा अड सुळे यांनी दिला आहे. तर या न्यायिक आंदोलनात माझ्या पतीच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास रिलायन्स व्यवस्थापन व प्रशासन जबाबदार असेल असा इशारा निकिता योगेश अडसुळे यांनी दिला आहे.
आपल्या मागणीचे व तक्रारी निवेदनाची प्रत माहितीकरिता रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक रायगड,कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अलिबाग,प्रांताधिकारी पेण, पोलीस निरीक्षक नागोठणे, आदींना देण्यात आले आहे. सदर नव्याने प्रकल्प उभारत असताना धक्कादायक म्हणजे यासंबंधी कोणतीही जनसुनावणी घेण्यात आली नाही तसेच स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी, नागरिकांच्या, एकाही समस्येचे निराकरण करण्यात आले नसल्याच्या तक्रारी रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या कडे करूनही प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, व स्थानिकांच्या प्रश्नावर प्रशासनाने एकही बैठक लावली नसल्याने स्थानिकांतून असंतोषाची भावना उफाळून आली आहे.