अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
अलिबाग तालुक्यातील कातळपाडा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उसने दिलेल्या पैशांच्या वादातून एका व्यक्तीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोन आरोपींना अटक केली आहे…कातळपाडा येथील अमित प्रफुल्ल वाघ वय वर्षे 37 यांनी कोपरी-कुर्डूस येथील एका व्यक्तीकडून उसने पैसे घेतले होते…पैसे परत न दिल्याने चंद्रकांत टिळक म्हात्रे आणि अक्षय नारायण म्हात्रे या दोघांमध्ये प्रचंड राग निर्माण झाला…बुधवारी रात्री दोघेही अमित वाघ यांच्या घरी गेले आणि पैशांची मागणी केली. या वेळी वाद सुरू झाला, जो पुढे चांगलाच विकोपाला गेला…चंद्रकांत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे यांनी प्रथम अमितसोबत वाद घालून त्याला शिवीगाळ केली, त्यानंतर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी अमितला घरातून बाहेर पडवीमध्ये खेचून आणले. त्यानंतर चंद्रकांतने अमितचा गळा दाबला तर अक्षयने त्याच्या गुप्त भागावर प्रहार केला. या गंभीर मारहाणीत अमित गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोयनाड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शोधमोहीम राबवली. अखेर गुरुवारी सायंकाळी आरोपींना अटक करण्यात आली…
याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात चंद्रकांत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे…पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याने स्थानिक नागरिकांमध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे. पैशांच्या वादातून एवढा गंभीर गुन्हा घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हा प्रकार समाजातील तणावपूर्ण परिस्थितीचे गंभीर दर्शन घडवत असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे..