मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो… पेण शहरात परप्रांतीय भाजीवालीची अरेरावी उघड…

0
65

 पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

दोन दिवसांपूर्वीच कल्याणच्या एका सोसायटीत अमराठी व्यक्तींनी एका मराठी इसमाला मारहाण केल्याची घटना घडली. शुल्लक मुद्यावरून झालेल्या वादानंतर अखिलेश शुक्ला नावाच्या इसमाने, त्याच्या पत्नीने आणि काही मित्रांनी धीरज देशमुख याला बेदम मारहाण केलीय गुरूवारी या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि हे प्रकरण विधानसभेपर्यंत जाऊन तापले . राज ठाकरे, संजय राऊत या नेत्यांनीही या मुद्यावरून ठाम भूमिका घेत कारवाईची मागणी केली. हा सगळा वाद ताजा असून तो अद्याप शमलेला नसतानाच आता पेणमध्ये देखील मराठी व हिंदी असा वाद रंगताना दिसत आहे. पेण शहरात भाजी विक्री करणाऱ्या परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेचा अरेरावी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ही भाजी विक्रेती महिला ग्राहकांसोबत उद्धटपणे बोलत असून ,’मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो…’ असे ती ग्राहकाला हिंदीमध्ये सांगताना दिसत आहे. परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेच्या या अरेरावीचा, उद्धटपणाचा, हा व्हिडिओ पेणमध्ये व्हायरल होत आहे. मराठी बोलण्यावरून वादाच्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान या परप्रांतीय महिलेविरूद्ध पेण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेला ताब्यात घेतले आहे.