रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ):-
आद्य समाज शिक्षिका,थोर समाज सुधारीका,भारतीय स्त्रीवादाची जननी,स्त्री शिक्षणाच्या उद्गात्या,भारतीय स्त्रीची प्रेरणा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची 194 वी जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात आली. बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परिवाराच्यावतीने नागोठण्यात सावित्रीमाईंची जयंती विविध वैचारिक,सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून डॉ.नेल्सन मंडेला आदिवासी आश्रमशाळा नागोठणेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व महिलांनी अतिशय अभ्यासू व प्रगल्भपणे सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्त्री जीवनाच्या उद्धारक सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या त्याग व समर्पणाने स्त्रीयांच्या जीवनाचा उद्धार झाला असल्याचे म्हटले. तर पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने महिलांना समानतेचे हक्क अधिकार मिळाले. सावित्रीमाईंच्या उगमाने समस्त स्त्रियांच्या शिक्षणाचा मार्ग खुला झाला. साताऱ्यातील एका गावात जन्मलेली मुलगी पुढे जाऊन समाजापुढे आदर्श महिला , आदर्श माता, आदर्श पत्नी, आदर्श बहीण, आणि लाखो जणांची रणरागिणी क्रांतिकारी विचारांची प्रेरणा ठरली.प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने नाहीत तर त्यांच्याही पाच पाऊले पुढें जाऊन आपले नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करीत आहेत…सावित्रीमाई चंदनापरी झिजल्या म्हणून आमच्या जीवनाचे सोने झाले असल्याची कृतज्ञता यावेळी व्यक्त करण्यात आली…कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परीवाराच्या अध्यक्षा राजश्री दाभाडे,तसेच बौद्ध समाज युवा संघ रायगडचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड पदाधिकारी व सभासदांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…